मुंबई - मुख्यमंत्र्यांचे पीए ते आमदार अशा मार्गाने विधानसभेत पोहोचलेले भाजपचे अभिमन्यू पवार आणि सुमित वानखेडे या दोन जणांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना (पाणंद) न्याय मिळवून दिला. या रस्त्यांसाठी ग्रामविकास विभागाच्या २५/१५ या शीर्षातून ५० टक्के निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
या रस्त्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल देईल आणि शेतरस्त्यांसाठीची एक सर्वंकष योजना सरकार तयार करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पाच वर्षांत मजबूत शेतरस्तेशेत रस्त्यांसाठी अभिमन्यू पवार यांचा लातूर पॅटर्न, सनदी अधिकारी एकनाथ डवले पॅटर्न आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपूर जिल्ह्यात राबविलेला पॅटर्न याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. पवार, वानखेडे, राजेश बकाने, विजय वडेट्टीवार यांनी शेतापर्यंत जाण्यासाठीचे रस्ते कसे गरजेचे आहेत, हे सांगत त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावा, ठोस तरतूद करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की येत्या पाच वर्षांत मजबूत शेत रस्ते मोठ्या प्रमाणात बांधले जातील. तर यासाठी लेखाशीर्ष व निधीची तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.