कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या निधनाचे दु:ख, त्याचा कंठात दाटलेला हुंदका घेऊन कार्यकर्ते उमाताई यांच्या प्रकृतीची चौकशी करून रुग्णालयातून शनिवारी बाहेर पडत होते. पानसरे अण्णांना आयुष्यभर साथ देणाऱ्या उमातार्इंना अण्णा आपल्यातून निघून गेल्याचे सांगता येत नाही. त्यांना त्यांचे अखेरचे दर्शनदेखील घेता आले नाही, याचे दु:ख पानसरे कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.हल्ला झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून पानसरे दाम्पत्यावर अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते याठिकाणी येत होते. पानसरे अण्णा आणि उमातार्इंना पाहता येत नसले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यात सुधारणा होत असल्याचे शब्द कानांवर पडल्यानंतर त्यांना दिलासा मिळत होता. पानसरे यांचे निधन झाल्याचे समजताच शुक्रवारी रात्रीपासून रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. उमातार्इंसमवेत रुग्णालयात त्यांच्या कनिष्ठ कन्या मेघा आणि अन्य नातेवाईक थांबून होते. बाबा गेल्याचे दु:ख, कंठात दाटलेला हुंदका सावरत मेघा या उमातार्इंच्या जवळ होत्या. अण्णांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कार्यकर्ते रुग्णालयात येत होते. (प्रतिनिधी)उमातार्इंची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना अण्णांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. त्यांना याची माहिती मिळू नये यासाठी त्यांच्या कुटुंबीयांसह रुग्णालय व्यवस्थापनाने दक्षता घेतली होती. त्यासाठी रुग्णालयातील टी.व्ही. बंद केले होते. शिवाय वृत्तपत्रेदेखील याठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. येथे शांतता पसरली होती. रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अण्णांना श्रद्धांजली वाहून कामकाजाला सुरुवात केली.डॉक्टरांना सलाम...हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पानसरे दाम्पत्याला उपचारांसाठी अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी कॉम्रेड गोविंद पानसरे व उमाताई यांच्यावर शर्थीने उपचार केले. हल्ल्यानंतर पाच दिवसांत त्यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत या डॉक्टरांना माझा त्रिवार सलाम, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली.प्रा. एन. डी. पाटील,डॉ. पवार यांना शोक अनावरज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे त्यांच्या पत्नी वसुधा यांच्यासह अंत्यदर्शनाला आले होते. पार्थिवाला वंदन करून डॉ. पवार पुढे येताच त्यांना प्रा. एन. डी. पाटील दिसले. शोकमग्न डॉ. पवार यांच्या भावना अनावर झाल्या. ते प्रा. पाटील यांच्या गळ्यात पडून ढसढसा रडू लागले. डॉ. पवार यांच्या पत्नी वसुधा पवार मुलगी मंजूश्री पवार यादेखील पानसरे यांची कन्या स्मिता, सून मेघा यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या. हे पाहून अनेकांना गहिवरून आले. हिंदुत्ववादी कार्यालयपरिसरात बंदोबस्तकोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासून शहरातील विविध हिंदुत्ववादी कार्यालयांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.पोलिसांना काढलेमंडपाबाहेर पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अद्याप पोलिसांना जमले नाही. त्यामुळे पोलीससुद्धा कार्यकर्त्यांच्या रोषाचे धनी ठरले. पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकात आले, तेव्हा रुग्णवाहिकेतून पार्थिव बाहेर काढण्यासाठी तसेच मंडपातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलीस पुढे सरसावले; पण गर्दीवरील नियंत्रण व पार्थिव आणण्याची जबाबदारी कार्यकर्ते घेतील, असे सांगत पोलिसांना बाजूला करण्यात आले; त्यामुळे पोलीसही बाजूला झाले.राजकीय नेत्यांची गोचीपानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांची रीघ लागली होती. यात राजकारण्यांचाही समावेश होता; परंतु पानसरे यांच्या हत्येमुळे राजकारणी मात्र ‘भाकप’च्या कार्यकर्त्यांच्या रोषाचे लक्ष्य ठरले. माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, आमदार के. पी. पाटील यांना अंत्यदर्शनासाठी बरीच यातायात करावी लागली. स्थानिक कार्यकर्त्यांनी विनंती करूनही त्यांना आत सोडले जात नव्हते. हाच अनुभव विक्रमसिंह घाटगे यांनाही आला. महानगरपालिकेचे पदाधिकारी, अनेक नगरसेवक यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडावे लागले. कोल्हापुरात सामसूम; उत्स्फूर्त बंदकोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हत्येमुळे शनिवारी संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले. शहरातील सर्व व्यवहार व व्यवसाय स्वत:हून व्यवसाय बंद ठेवत शहरवासीयांना पानसरे यांना आदरांजली वाहिली. बंदसदृश्य परिस्थितीमुळे शहरात दिवसभर सन्नाटा व सामसुमीचे वातावरण होते. शहरातील शाळांना सुटी देण्यात आली रस्त्यांवर नीरव शांतता असल्याने के.एम.टी. बसेसही प्रवाशांअभावी धावत होत्या.