- विशेष प्रतिनिधी मुंबई - भायखळ््यातील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयासाठी आरक्षित जमिनीपैकी ५० टक्के जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली असून या बागेच्या विस्ताराचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.भाजपाचे अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी या बाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या उद्यानाशेजारची जागा ही मे.मफतलाल इंडस्ट्रिजला ९९ वर्षांच्या लिजवर दिली होती. १९९१ च्या विकास आराखड्यात महापालिकेने त्यातील ५० टक्के जागा उद्यान विस्तारासाठी राखीव केली. ती २७२८४ चौरस मीटर जागा आता महापालिकेला परत मिळाली आहे. उर्वरित जमिनीचा वापर मे.मफतलाल इंडस्ट्रिजने केला आहे. त्यापोटी त्यांनी ५५० कोटी अनर्जित रक्कम शासनाकडे भरावी, असे त्यांना कळविले होते. त्या विरुद्ध ते न्यायालयात गेले आहेत.यावेळी झालेल्या चर्चेत जयंत पाटील, संजय सावकारे, शशिकांत शिंदे सहभागी झाले. विकासकाकडून ५५० कोटी रुपये वसूल झाल्यास हा निधी गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्याकरता वापरावा, अशी सूचना शिंदे यांनी केली.
जिजामाता उद्यानाचा लवकरच विस्तार, मुख्यमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:27 IST