दिगांबर जवादे,
गडचिरोली- कोरची तालुक्यातील जांभूळ महाराष्ट्रासह छत्तीसगड व तेलंगण राज्यांत प्रसिद्ध आहे. कोरची तालुक्यातील हजारो नागरिकांना यामुळे रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. आता पुढील महिन्यात होणाऱ्या ‘जांभूळ महोत्सवा’ची जय्यत तयारी सुरू झाली आहे.जूनपासून जांभळाचा मोसम सुरू होतो. जांभूळ हे अतिशय नाजूक फळ आहे. कोरचीतील जांभळाची अधिकाधिक प्रसिद्धी करून स्थानिक नागरिकांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभूळ महोत्सव साजरा केला जातो. या वर्षीसुद्धा हा महोत्सव करण्याची तयारी कृषी विज्ञान केंद्राने केली आहे.कृषी विज्ञान केंद्राच्या प्रा. योगीता सानप कोरचीतील महिलांना जांभळापासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे अनेक बचत गटांनी जांभळापासून पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आहे. >जांभळाचे औषधी गुणधर्मजांभळात लोहाचे प्रमाण अधिक आहे. रक्ताचे शुद्धीकरण, पांडूरोग, कावीळ आदी विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे. जांभळाची साल पाचक व जंतूनाशक आहे. जांभळाच्या नियमित सेवनाने मधुमेह आटोक्यात येण्यास मदत होते. जांभळाचे इतरही उपयोग जांभळावर प्रक्रिया करून जॅम, जेली, चिप्स, वाइन, विनेगार, लोणची तयार केली जातात. पानांपासून दंतमंजन तयार केले जाते. जांभळाचा उपयोग साबण, अत्तर, कापड उद्योगांमधील रंगकाम आदींसाठी केला जातो.