ऑनलाइन टीम
रत्नागिरी, दि. २५ - रत्नागिरीतील दापोली येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. हे सर्व पर्यटक पुण्यातील असून मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणारे चार कुटुंब उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी दापोलीत आले होते. आंजर्ले - हरणे समुद्रातील अडखळ खाडीत हे पर्यटक पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नऊ जण पाण्यात बुडू लागले. या घटनेनंतर स्थानिकांनी नऊपैकी तिघांना यशस्वीरित्या पाण्यातून बाहेर काढले. मात्र उर्वरित सहा जणांना जलसमाधी मिळाली. सहा पैकी तिघा जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित तिघा जणांचा शोध सुरु आहे. श्रृती डांगे (वय १३), संगीता ओझा (३४ वर्ष) आणि पवन (वय ६ वर्ष) अशी या तिघा मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर पुण्यातील दत्तवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.