प्रशासनाने तोडगा काढण्याची सूचना : ४ कोटींचे उत्पन्न मिळणे शक्यजळगाव: मनपाकडे मार्केटच्या गाळे हस्तांतरणाची सुमारे ३०० प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत आकारावयाच्या शुल्काबाबतचा निर्णय होऊ न शकल्याने मनपाचे उत्पन्न बुडत आहे. हा निर्णय होईपर्यंत मनपाने ‘नाव बदल करण्याची फी’ अशा नावाने शुल्क वसुल करून हे हस्तांतरण अधिकृत करावे. जेणे करून मनपाला तब्बल ४ कोटींचे उत्पन्न मिळू शकेल. त्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव द्यावा, अशी सूचना केली असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, मनपाच्या मार्केटमधील गाळे ज्या व्यापाऱ्यास कराराने दिले आहेत, त्या व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्यास परस्पर तो गाळा देऊ नये यासाठी मनपात अर्ज करून गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र सुधारीत शासननिर्णयानुसार रेडीरेकनरच्या दराने २५ टक्के शुल्क आकारावे की कसे? याबाबतचा निर्णय रखडला आहे. यासाठी महासभेने नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापनाही केली होती. मात्र या समितीकडूनही निर्णय न झाल्याने हा विषय प्रलंबितच आहे. मात्र त्यामुळे गाळे हस्तांतरणाची सुमारे ३०० प्रकरणे प्रलंबित आहे.
यापूर्वी सुमारे ५० हजारांच्या आसपास शुल्क या प्रक्रियेसाठी वसुल केले जात होते. त्यामुळे मनपाने ७५ हजार अथवा १ लाखापर्यंत जरी शुल्क आकारले तरी त्यातून मनपाला सुमारे ४ कोटींचे उत्पन्न मिळू शकेल. मनपाने दूर्लक्ष केल्यास व्यापाऱ्यांकडून परस्पर हस्तांतरण होऊन मनपाचे नुकसान होईल. त्यामुळे हस्तांतरणाच्या शुल्कावर निर्णय होईपर्यंत वेगळ्या नावाने हे शुल्क वसुल करून मंजुरी देण्याची सूचना महापौरांनी केली आहे.