सलमानचा धाडसीपणा मी अनुभवला आहे. ‘युवराज’ चित्रपटाच्या वेळी सलमानला समजून-उमजून घेण्याची मला संधी मिळाली. या अनुभवाच्या आधारे मी ठामपणे सांगू शकतो की, सलमान अत्यंत निर्मळ मनाचा माणूस आहे. तो सदैव दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर असतो. वडिलांपासून त्याला परोपकाराचा वारसा मिळाला आहे. त्याचे वडील सलीम यांनी फिल्म इंडस्ट्री गाजवली. त्यांनाही नाव, प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. सलमाननेही खूप खस्ता खाल्ल्या. सलीम यांचा मुलगा म्हणून त्याला सहज ब्रेक मिळाला असता. सलीम यांनी आपल्या मुलांसाठी शिफारस केली असेल, असे मला तरी वाटत नाही. फिल्म इंडस्ट्रीत नाव कमवायचे असेल तर स्वत:नेच तयारीनिशी पाऊल टाकले पाहिजे, असा संदेश सलीम साहेब देत. त्यानुसारच सलमानने रुपेरी दुनियेत पदार्पण करीत संघर्ष केला. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटापासून त्याने काही चित्रपटांचा अपवाद वगळता यशस्वी कारकिर्दीचा वारू अडखळू दिला नाही. आत्मविश्वासाने त्याने वाटचाल कायम ठेवल्याने तो आज आघाडीचा स्टार म्हणून ओळखला जातो.मुळातच सलमानला त्याच्या कुटुंबीयांकडून बऱ्याच गोष्टींचा वारसा मिळालेला आहे. तो कुटुंबवत्सल आहे. कुटुंबालाच तो प्राधान्य देत आला आहे. त्याचे हे संस्कार भारतीय संस्कृतीशी मेळ घालणारे आहेत. मित्र-परिवार आणि जवळच्या तसेच गरजू लोकांसाठी जे करणे शक्य आहे, ते त्याने केले. दुसऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या त्याच्यासारख्या व्यक्ती समाजात बोटावर मोजण्याइतक्याच असतात. स्पष्टपणा हा सलमानचा विशेष गुण. काय करायचे, बोलायचे ते अगदी स्पष्टपणे. सलमानने आजवरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो सामोरा जात आला. जिव्हाळा असलेल्या लोकांजवळच तो मन मोकळं करतो. स्वत:च्या दु:खापेक्षा तो इतरांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करतो. तो मनाने अत्यंत बलवान आहे. एवढेच नाहीतर परिस्थितीने त्याला अधिक ताकदवान बनविले आहे.सध्या त्याच्याविरुद्ध कोर्टात असलेले प्रकरण गंभीर आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. आम्ही बॉलीवूडची मंडळी सलामानच्या पाठीशी उभे राहतो, म्हणजे आमच्या ठायी कायद्याचा आदरच नाही, असे नाही. परंतु, मीडियातील काही जण मात्र चुकीचा अर्थ काढतात. बॉलीवूड आमच्यासाठी एक परिवार आहे. परिवारातील एखाद्यावर अशी परिस्थिती ओढवल्यास त्याच्या पाठीशी राहून धीर देण्यात काय गैर आहे? न्यायालय आणि कायद्याविषयी आम्हाला आदर आहे आणि पुढेही आदर करीत राहू. तसेच या कठीण काळात सलमानला पाठिंबाही देत राहू... बाकी सर्व देवाच्या हाती.
‘त्याची’ बाजू घेणे म्हणजे कायद्याचा अनादर नव्हे
By admin | Updated: May 9, 2015 01:49 IST