अकोला: विद्युत तारांवर आकोडे (हूक) टाकून वीज चोरी करणे आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेल्या विद्युत वाहिन्यांचा (एअर बॅन्च केबल -एबीसी) वापर करणे सुरू केले आहे. त्यामुळे आता वीज चोरी करणे अशक्य होणार आहे. विद्युत निर्मिती क्षेत्रापासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहोचविताना विद्युत तारांमधून जवळपास १४ टक्के वीज गळती होते. तसेच अनेक गावांमध्ये, शहरातील गरीब भागात तारांवर आकोडे किंवा हूक टाकून वीज चोरी केली जाते. हे रोखण्याकरिता महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेली विद्युत तार बनविली आहे. महावितरणने वीज बिलाच्या वसुलीनुसार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-१, जी-२ असे फिडर तयार केले आहे. यामध्ये ई, एफ व जी-१, जी-२ या फिडरमधून ज्या भागात विद्युत पुरवठा होतो, तेथेच भारनियमन केले जाते. महावितरणच्या वतीने सध्या राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प- १ सुरू आहे. याअंतर्गत पुनर्रचित गतिमान विद्युत सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या फिडरवर जास्त वीज चोरी आहे, अशा फिडरवरील लघू वाहिन्या बदलून त्या ठिकाणी प्लास्टिकचे आवरण असलेली तार लावण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही जिल्हय़ांची निवड करण्यात आली असून, नंतर संपूर्ण राज्यात याच तारेचा वापर केला जाणार आहे.
जीवित हानीही कमी होणार
एखाद्या कॉलनीमधील किंवा ग्राहकाच्या घरातील विद्युत प्रवाह बंद झाला तर अनेकदा लाइनमन किंवा अन्य व्यक्ती खांबावर चढून बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एबीसीमुळे या अपघातांवर नियंत्रण मिळविता येणार आहे. तारांवर पक्षी, वटवाघळं, माकड नेहमीच बसतात. त्यांचाही अनेकदा दोन तारांना स्पर्श झाला तर मृत्यू होतो. या तारांमुळे पक्षी व प्राण्यांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी होणार आहे.
चारऐवजी एकच तार
महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेली तार (एअर बॅन्च केबल -एबीसी) चा वापर करणे सुरू केले आहे. सध्या रोहित्रापासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत खांबाद्वारे चार तारांच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. आता मात्र चार तारांऐवजी केवळ एकाच तारेचा समावेश राहणार आहे.