शिर्डी (जि. अहमदनगर) : हजारो कोटींचे पॅकेज जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पगारासाठी तिजोरीत पैसा नसल्याचे सांगणे हा विरोधाभास आहे़ सरकार कोणाचेही असो, मात्र काँग्रेसला बदनाम करण्याच्या प्रयत्नात सरकारची निरर्थक बदनामी न करता जबाबदारीने विधाने करावीत, असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला़साई दर्शनासाठी आलेल्या विखे यांनी पत्रकारांशी बोलताना मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराबद्दलच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी करावी, अशी मागणी केली़ रस्त्यांची दुरवस्था असून कचरा टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला़ भाजपा खा. संजय धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान दुर्दैवी आहे़ धोत्रे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी तसेच भाजपानेही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विखे यांनी केली़ धोत्रे पूर्वी बियाणे महामंडळात होते़ त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत मागणी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला़शेतकरी नसलेल्या शहरी लोकांना कर्ज वाटल्याच्या पत्रकार साईनाथ यांच्या आरोपांबाबत विखे म्हणाले की, त्यांनी निश्चितच अभ्यास केलेला असेल. याबाबत माहिती घेऊ़ मात्र कर्जवाटप कुणाच्याही काळात होवो, सरकारचा पैसा अनाठायी जाता कामा नये, त्यामुळे या आरोपांचीही चौकशी व्हावी़ धार्मिक स्थळांना असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरासाठी सीआयएसएफची आवश्यकता आहे़ सरकार पैसे घेऊन उद्योगपतींना सुरक्षा पुरवते, तर मंदिरासाठी का नाही, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)
तिजोरीत पैसा नसल्याचे सांगणे म्हणजे सरकारचीच बदनामी
By admin | Updated: December 29, 2014 05:11 IST