चिंचवड : न्याय, समता, बंधुत्व या तत्त्वांसाठी महंमद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली. पैगंबर हे अतिशय संवेदनशील आणि सखोल चिंतन करणारे प्रेषित होते. माणसाचा अंतर्बाह्य शोध घेण्याच्या दृष्टीने त्यांनी इस्लामची स्थापना केली. परंतु, अनुयायांनी ही तत्त्वे योग्य पद्धतीने जगापुढे आणली नाहीत म्हणून इस्लामविषयी प्रचंड गैरसमज आहेत, असे प्रतिपादन पुरोगामी विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी केले. मोहननगर, चिंचवड येथे जय भवानी तरुण मंडळ आयोजित फुले - शाहू - आंबेडकर - लोकमान्य व्याख्यानमालेत ‘इस्लामचे विविध क्षेत्रांतील विधायक योगदान’ या विषयावर मुकादम बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव होते. स्वराज अभियानाचे इब्राहिम खान, हुसेन शेख, कवी अशोक कोठारी उपस्थित होते. मुख्य संयोजक मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानाच्या माध्यमातून मुस्लिमांचे विधायक योगदान समाजापुढे आणणे आवश्यक वाटले, असे ते म्हणाले.मुकादम म्हणाले की, इस्लामपूर्वीही जगात हिंसाचार होता. ख्रिश्चन धर्मातही हिंसाचार आहे; परंतु इस्लाम म्हणजे हिंसाचार, असाही गैरसमज आहे. अनेकांना हेदेखील माहीत नसेल की, महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्म स्थापन करण्याची प्रेरणा महंमद पैगंबर यांच्यापासून घेतली होती. एकेश्वरवादी संकल्पनेतून इस्लामची निर्मिती करून पैगंबरांनी वाचन करा, ज्ञान मिळवा, असा पहिला संदेश दिला. अनुयायांनी फक्त इस्लामसंबंधी ज्ञान मिळवावे, असा त्याचा संकुचित अर्थ घेतला. मार्क्सपूर्वी इस्लामने अर्थशास्त्राची मांडणी केली होती. (प्रतिनिधी)
माणसाच्या अंतर्बाह्य शोधासाठी इस्लाम
By admin | Updated: April 30, 2016 01:21 IST