भार्इंदर : इस्कॉनने मीरारोडच्या सृष्टी परिसरात नव्याने बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा. संजय राऊत, खा. राजन विचारे, आ. मुझफ्फर हुसेन, माजी आ. विनोद घोसाळकर, मंदिराचे अध्यक्ष कमल लोचनदास, उपाध्यक्ष हर्षगोविंद प्रभुजी आदी मान्यवर उपस्थित होते. हे मंदिर गोरेगाव ते विरारपर्यंतच्या संपूर्ण उपनगरातील सर्वात मोठे व सर्वात सुंदर मंदिर असून ते इस्कॉनच्या स्थापनेच्या ५० व्या वर्षाच्या साजरीकरणानिमित्त लोकांकरिता सुरु केले आहे. ते अत्यंत सुंदर असून अंतर्गत रचना व प्रचंड लाकडी वेदीसह पूर्णपणे संगमरवरी दगडांसह बनवले आहे. त्याच्या दरवाजे व प्रवेशद्वारांवरील सर्व लाकडी रचनांवर शुद्ध सोनेरी मुलामा दिला आहे. मंदिराची रचना डोळे दिपवून टाकते. ते आध्यात्मिक शिक्षण प्रदान करण्याकरिता समर्पित असून भगवान कृष्णाच्या दर्शनासाठी असले तरी बांधकाम शैलीतील एक उत्तम नमुन्यामुळे ते लवकरच पर्यटनासह सांस्कृतिक स्थळ ठरणार आहे. येथे समाजाच्या उद्धाराकरिता येथे सेमिनार्स, उत्सव, कोर्सेस इत्यादींचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिरासह येथे भेट देणारे भक्त व इस्कॉनच्या सदस्यांकरिता राहण्यास नवीन गेस्ट हाऊस सुद्धा बांधले आहे.
मीरा रोडचे इस्कॉन मंदिर भाविकांसाठी खुले
By admin | Updated: September 27, 2015 05:44 IST