नाशिक : महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने नसल्याचा पुनरुच्चर करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत गेल्यानंतर मराठी कलावंतांनाही उतरू न देणा:या या सदनाच्या कारभाराचीच चौकशी करा, अशी मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र सदन आणि नाशिकचे नाते आहे. (भुजबळांचा नामोल्लेख टाळून!) या सदनाच्या बांधकामाबाबतच्या चौकशीकडे सरकारने दुर्लक्ष केले. महाराष्ट्र सदनात मध्यंतरी मराठी कलावंतांनाही उतरू देण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे मराठी माणसाला या सदनात अशी वागणूक मिळत असेल, तर महाराष्ट्र सदनाऐवजी लॉजिंग-बोर्डिग असे नाव द्या, असा उपरोधिक सल्लाही ठाकरे यांनी दिला. तसेच सदनातील या कारभाराबद्दल आयुक्त बिपिन मलिक यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्वीच्या राजपत्रत चूक झाली आहे. त्यात ‘ध’ चा ‘मा’ झाला असून, ही चूक सुधारली गेली पाहिजे. या समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असेही ठाकरे म्हणाले.
नंदुरबारचे गावित शिवसेनेत
माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित, तसेच धुळ्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक सतीश महाले यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.