डोंबिवली : ‘चतुरंग प्रतिष्ठान ही संस्था साहित्य चळवळीत तब्बल ४०हून अधिक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या २४व्या ‘रंगसंमेलना’त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचा आनंद वाटतो. परंतु ज्या जीवनाचा गौरव झाला त्याच्याविषयी अंतर्मुख होऊन भाष्य करताना रसिक प्रेक्षकांशी मन मोकळे करताना सांगावेसे वाटते की, लेखनामध्ये आविष्कार स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्या लेखणीला अर्थ नसतो,’ असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी काढले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.कलावंताने प्रामाणिक राहावे, तसेच साहित्यिकाने स्वातंत्र्याचे जतन करावे, असे मतकरी म्हणाले. ‘सर्वसामान्य कलावंत आणि साहित्यिक म्हणून जगताना त्यातील ‘सामान्य’ असणे आवश्यक असून त्यासाठी स्वच्छ प्रतिमा असणेही तेवढेच महत्त्वाचे असते. साहित्यिकाला सुचणाऱ्या कल्पना निर्भीडपणे मांडण्याचेही स्वातंत्र्य असायला हवे, हुकूमशाहीला आव्हान देणे, त्यासाठी न्यायाची लढाई करणे अत्यावश्यक आहे,’ असे ते म्हणाले. ‘साहित्यक्षेत्रात काही गट सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही,’ अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. ‘जे लिखाण स्वत:ला समाधान-आनंद देऊ शकत नसेल ते लिखाण कसले, त्यामुळे असा अप्रामाणिक कलावंत नसावा,’ असे ते म्हणाले. ‘सचोटीने वागत आनंद कशात आहे हे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ लोकाश्रयातून आणि त्यांच्याच देणगीतून देण्यात आलेल्या या जीवनगौरवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,’ असे ते म्हणाले. झोपडपट्टीतील मुलांमध्येही कलागुण असतात, त्यांनाही हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘वंचितांची रंगभूमी’ निर्माण करण्याचा चंग मतकरींनी बांधला आहे. ३० डिसेंबरपासून ठाण्यातील ‘समता विचार’ या संस्थेच्या सहकार्याने त्याच दृष्टीने काही निवडक भागातील २० गटांमधून चांगले कलाकार रंगभूमीला मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निवडीची प्राथमिक फेरी घाणेकर नाट्यगृहात होणार असून, अंतिम निवड ही ४ जानेवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर (गौरवशब्द), डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, सुधीर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मतकरींना डॉ. आगाशेंच्या हस्ते देण्यात आला. १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याच निमित्ताने प्रतिभा मतकरी (पत्नी) यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
लेखनात स्वातंत्र्याचा आविष्कार महत्त्वाचा !
By admin | Updated: December 29, 2014 05:43 IST