नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारित भाजी मार्केटला लागून एमटीएनएलचा भूखंड आहे. या भुखंडाची संरक्षण भिंत तोडून वाहनतळ तयार केला आहे. वाहने उभी करण्यासाठी शुल्क आकारले जात असून, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. एमटीएनएलच्या भूखंडावर झोपड्यांचे अतिक्रमण होऊ लागले होते. पालिकेने झोपड्या हटविल्यानंतर तेथे संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी येथील संरक्षण भिंत तोडून आतमधील जागेवर पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. वास्तविक एमटीएनएलने वाहनतळासाठी कोणत्याही निविदा मागविल्या नव्हत्या. या भूखंडावर खासगी ठेकेदार वाहने उभी करण्यासाठी शुल्क आकारत आहे. परंतु संबंधित ठेकेदाराचे नाव, संपर्क क्रमांक, वाहनतळ चालविण्याचा परवाना कोणी दिला, याविषयी काही माहिती नाही. वाहनतळात सुरक्षेसाठीही काहीच उपाययोजना केलेली नाही. बिनधास्तपणे सुरू असलेल्या या वाहनतळामध्ये काहीवेळा रात्री मद्यपान सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. या ठिकाणी वाहनतळ अधिकृत आहे का, अधिकृत असेल तर त्याविषयी फलक, ठेकेदाराचे नाव, शुल्क आकारणीचे स्वरूप याचे स्पष्ट बोर्ड लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
तुर्भेत अवैध वाहनतळ
By admin | Updated: April 28, 2016 03:13 IST