कोल्हापूर : आपण ज्या समाजात वावरलो, लहानाचे मोठे झालो, बालपणी आपल्यावर ज्या समाजातील माणसांचे संस्कार झाले, त्या समाजाचे ऋण आपल्यावर आहे. त्याची परतफेड करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्याचे कार्य ‘लोकमत’चे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ हे पुस्तक करतेय. काहीशा अशाच प्रेरणेतून ‘विटी दांडू’ चित्रपटाची निर्मिती झाली आहे, असे मत ‘विटी दांडू’ चित्रपटाचे कथालेखक-अभिनेते विकास कदम यांनी व्यक्त केले.‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांच्याबरोबर कदम आले होते. त्यावेळी बोलताना कदम म्हणाले, वास्तविक पाहता ‘विटी दांडू’ हा बालपणातील खेळ. आपण मोठे होत असताना त्याचा विसर पडतो; पण छोट्या-छोट्या गोष्टीतच सुख-समाधान लपलेले असते. हेच प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न ‘विटी-दांडू’तून केला आहे.गावातील विविध प्रकारच्या लोकांमध्ये असलेली नाती, त्या नात्यांमधील ऋणानुबंध, गावातील छोटे-मोठे हेवेदावे, त्यातून उत्पन्न होणारे कटू-गोड प्रसंग दाखवत असतानाच एखाद्या संकटप्रश्नी सर्व विसरून एकत्रित येणारे व एकजुटीने लढा देणारे गाव दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. त्याचबरोबरीने पोवाडा, भारूड, लावणी, क्रांती गीत अशी विविधांगी सहा गाणीसुद्धा या चित्रपटात आहेत, असेही कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विकास कदम हा सुद्धा ‘आयकॉन’ : अजय देवगणविकास कदम यांचा जीवन प्रवास तसा खडतरच. कुंडलवाडी (ता. वाळवा) हे वडिलोपार्जित गाव. वडील आणि आजोबा दोघेही मुंबईतील गिरणी कामगार. पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण परेल-मुंबई येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात झाले. महाविद्यालयापासून नाटक-चित्रपटांचे वेड असलेल्या विकास यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘आॅल दि बेस्ट’ या गुजराथी नाटकापासून केली. साधारणत: १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी-हिंदी चित्रपट आणि काही दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ‘विटी दांडू’ या पहिल्याच कथेला त्यांना प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा निर्माता मिळाला आहे, ही त्यांच्या यशस्वीतेची पावती आहे.
‘विटी दांडू’साठी ‘आयकॉन्स’चीच प्रेरणा
By admin | Updated: November 24, 2014 00:24 IST