मुंबई/पुणे : देवनारमधील निंबोळीबाग परिसरातील वॉर्ड क्रमांक १३८ चे नगरसेवक अरुण विश्वनाथ कांबळे यांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे एटीएसने चौकशी केली. अरुण कांबळे हे भारिपचे मुंबईतील एकमेव नगरसेवक असून, ते प्रभाग समितीचे अध्यक्ष देखील होते. देवनार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एटीएसला एका संशयित नक्षलवाद्याकडून काही कागदपत्रे मिळाली. त्यातील काही कागदपत्रे अरुण कांबळेंशी संबंधित असल्याने पुणे एटीएसचे अधिकारी देवनारला दाखल झाले होते. त्यांनी तेव्हा कांबळेंची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर कांबळेंना पुणे एटीएसने पुण्यात बोलावून घेतले. त्यानंतर संशयित नक्षलवाद्याशी संबंधित असल्याच्या कारणावरुन कांबळेंची पुणे एटीएसने चौकशी करुन त्यांना नंतर सोडून देण्यात आले. देशभक्ती युवा मंचाच्या माध्यमातून नक्षलवादी कारवाया करणाऱ्या अरुण भानुदास भेलके ऊर्फ शरमन जाधव ऊर्फ संजय कांबळे ऊर्फ राजन ऊर्फ संघर्ष ऊर्फ आनंद (३८) याला पत्नी कांचनसह पुणे एटीएसने १ सप्टेंबरला अटक केली होती. पुण्यातील मास मूव्हमेंट नावाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून या तरुणांना ‘अर्बन नक्षलवादा’साठी तयार करण्याचे काम तो करीत होता. त्याच्या चौकशीत या नगरसेवकाने भेलके याला आधारकार्ड काढून देण्यास सहाय्य केल्याचे समोर आले आहे़ भेलकेकडून नक्षलवादी कारवायांसदर्भात त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
देवनारच्या नगरसेवकाची एटीएसकडून चौकशी
By admin | Updated: September 8, 2014 03:23 IST