मुंबई : गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विशेषत: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिलेल्या महानंदमधील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (ईओडब्ल्यू) चौकशी करण्याचे आदेश दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिले. महानंदबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने एक उच्चस्तरीय बैठक खडसे यांनी मंत्रालयात घेतली. या बैठकीला एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित, ईओडब्ल्यूचे सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर, सचिव महेश पाठक, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील आदी उपस्थित होते. खडसे यांनी लोकमतला सांगितले की, सहकार कायद्यानुसार आधीच या घोटाळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पण तिला विलंब लागू शकतो. आलेल्या तक्रारी बघता घोटाळे गंभीर स्वरुपाचे दिसतात. या पार्श्वभूमीवर एसीबी आणि ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करणे आवश्यक असल्याने तसा आदेश आपण आज दिला. हा घोटाळा प्रकर्षाने समोर आला तो २००५ मध्ये. त्यावेळी १४ जणांना अटकही करण्यात आली होती. तेव्हाच हा घोटाळा १०० कोटींच्या घरात होता. अलिकडेपर्यंत संचालक मंडळात राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. महानंदच्या अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या निकटवर्ती वैशाली नागवडे यांनी अलिकडेच राजीनामा दिला. महानंदच्या खर्चाने विदेश दौरे करणे, खर्चाचा हिशेब न देणे, दूध भुकटी प्रकल्पातील गैरव्यवहार आदी प्रकरणे चौकशीच्या टप्प्यात असतील, असे म्हटले जाते. (विशेष प्रतिनिधी)
महानंदमधील घोटाळ्यांची एसीबीमार्फत चौकशी करा -खडसे
By admin | Updated: September 24, 2015 01:55 IST