विरार : रेल्वेत फेरीचा धंदा करणाऱ्या एका तरूणाने हप्ता न दिल्याने संतापलेल्या आरपीएफच्या पोलिसांने दारुच्या नशेत फेरीवाला तरुणाला रात्रभर कोठडीत डांबून ठेऊन बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणाने वसई येथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली असून चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुरु केली आहे. हरी तोमर हा रेल्वेत किरकोळ सामान विकण्याचे काम करतो. गुरुवारी रात्री आरपीएफचा पोलीस दिनेश स्वामी याने दारुच्या नशेत वसई रेल्वे स्टेशवरील कोठडीत कोंबून ठेऊन रात्रभर बेदम मारहाण केल्याची तक्रार तोमर याने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. हप्ता न दिल्यानेच स्वामीने बेकायदेशिर डांबून मारहाण करून सकाळी सोडून दिले असा तोमर याचा आरोप आहे. गुरुवारी रात्री दिनेश स्वामी नावाच्या पोलीस हवालदाराने तोमर यांस उचलून पोलीस ठाणेमध्ये नेले. कोठडीत टाकून लाकडी दांडयाने बेदम मारहाण केली. सुरुवातीला स्वामी याने हाताने मारहाण केली. तब्बल एक तास तोमरला मारहाण करण्यात करण्यात आली. बेदम मारहाण केल्यावर कमरेवर दोन्ही पाय देवून उभा राहून स्वामीने तोमरला अमानुष मारहाण केली. जखमी हरी तोमरला वैद्यकीय तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. स्वामी कामावर हजर होता की नाही याची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले.दरम्यान, वसई विरार परिसरात असलेलेल रेल्वे स्टेशन, रेल्वे पादचारी पूल आणि सब वे मध्ये फेरीवाल्यांनी बाजार मांडलेला असतो. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत आरपीएफचे पोलीस फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली करून त्यांना संरक्षण देत असल्याचे तोमरच्या आरोपानंतर समोर आले आहे. (वार्ताहर)
नशेत फेरीवाल्याला अमानुष मारहाण
By admin | Updated: March 4, 2017 03:13 IST