मुंबई : श्रावण सुरू झाला की सणांचा उत्साह ओसंडून वाहतो. सणांनिमित्त घरोघरी गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. मात्र या वेळी सणांनिमित्त घराघरातील गोडधोड पदार्थांसाठी लागणाऱ्या साहित्यांचे म्हणजे तांदळाचे पीठ, गूळ, साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महागाईला फोडणी मिळाली असून, या जीवनाश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. आता तर गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असून, साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने मुंबईकरांना खर्चात कपात करत बजेट सांभाळावे लागत आहे.मुंबई आणि उपनगरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. दहा दिवस येणाऱ्या बाप्पाला प्रत्येक दिवस काही तरी वेगळा नैवेद्य करून देण्यासाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. मोदक, शिरा, पातोळ्या, शिरवळ्या असे पारंपरिक पदार्थ खासकरून या दिवसात आवर्जून बनवले जातात. गणेशोत्सवानंतरही सणांची ही लगबग कायम असते. विशेष म्हणजे या दिवसांत पाहुण्यांचा घराघरात राबता असतो. त्यामुळे पंचपक्वानाचा बेतही आखला जातो. मात्र किराणा साहित्याचे दर वाढल्याने मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी डाळ आणि भाज्यांच्या दरात झालेल्या वाढीने मुंबईकरांचे कंबरडे मोडले होते. यात आताही फार काही सुधारणा झालेली नाही. तूरडाळीच्या किमती वधारल्याने अनेकांनी कमीत कमी तूरडाळ वापरून स्वयंपाक केला होता. शिवाय पालेभाज्यांच्या किमती वाढल्यानंतर अधिकाधिक गृहिणींनी कडधान्यांचा वापर केला. मात्र यात भर म्हणून आता किराणाचे साहित्यही महाग झाले आहे. (प्रतिनिधी)>सणासुदीच्या काळात महागाई असतेच. पण नाइलाजही असतो. होलसेल बाजारातून किराणा खरेदी करताना किमती वाढलेल्या असतात. त्यामुळे ग्राहकांनाही चढ्या भावातच किराणा विकावा लागतो.- महेश राव, किराणा माल विक्रेता, अंधेरी
सणासुदीच्या काळात महागाईची फोडणी
By admin | Updated: August 22, 2016 02:49 IST