Sharad Pawar Statement on Warkari: "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोाकांची घुसखोरी झाली आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे", असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आहे. या स्मरणिकेतील मुलाखतीत शरद पवार त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल भाष्य केले आहे.
वारकरी संप्रदायाबद्दल पवारांचे विधान काय?
शरद पवार भूमिका मांडताना म्हणाले, "वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात."
पवार पुढे म्हणाले की, "म्हणून आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारणतः चाळीस लोक असे आहेत की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन आणि प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने प्रबोधनाच्या या मार्गावर महिला कुठे दिसत नाहीत", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संजय शिरसाट यांची टीका
शरद पवारांच्या विधानावर बोलताना कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "वारकरी संप्रदायात अनेक जातींचे लोक असतात. एकाच जातीचा कुणी नसतो. त्याला जातीय बळ देणे हा प्रचार सुरू आहे. हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू समाजाची ताकद विभक्त करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करू नये, त्यात जातीय घुसखोरी असे म्हून नये."
शरद पवार सत्य बोलले, अमोल मिटकरींची भूमिका
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, "शरद पवार काय चुकीचे बोलले आहेत? त्यांनी मांडलेले विचार सत्य आहेत. पवार यांनी मांडलेल्या ६० टक्के आकडेवारीपेक्षा ही संख्या अधिक आहे. शरद पवारांवर टीका करणारे काही तथाकथित महाजांनी जेव्हा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले, तेव्हा शांत का होते?", असा सवाल मिटकरींनी केला आहे.
"गेल्या तीन महिन्यांत लिंगपिसाट अशोक खरात नावाच्या धर्मबुडव्याला जेव्हा पांडुरंगाची उपमा दिली गेली, तेव्हा वाईट न वाटणारे आता ओरडत आहेत. अहिल्यानगरमधील पारनेरमध्ये दुर्गादेवी वारकरी संस्थेचा गुंजाळ महाराज, ज्याने १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. तेव्हा आंदोलन न करणारे आता कसे बोलतात?", असा सवाल मिटकरींनी केला.
"आळंदीमध्ये खासगी वारकरी शिक्षण संस्थेत मुलीला डांबून ठेवून अत्याचार केले गेले. तेव्हा शांत बसणारे, जे कथित प्रतिगामी आहेत त्यांची टक्केवारी शरद पवार यांनी मांडली आहे, ती ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अध्यात्मिक आचार्याला उर बडवायची काही गरज नाही", असे मिटकरी म्हणाले.
Web Summary : Sharad Pawar alleges regressive elements infiltrated the Warkari sect, with 60% supporting fanaticism. Sanjay Shirsat criticized the statement, while Amol Mitkari defended Pawar, citing atrocities and supporting his claims.
Web Summary : शरद पवार का आरोप है कि वारकरी संप्रदाय में प्रतिगामी तत्वों की घुसपैठ हुई, जिसमें 60% कट्टरता का समर्थन करते हैं। संजय शिरसाट ने बयान की आलोचना की, जबकि अमोल मिटकरी ने अत्याचारों का हवाला देते हुए पवार का बचाव किया और उनके दावों का समर्थन किया।