ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - शीना बोरा हत्याप्रकरणात अटकेत असलेली इंद्राणी मुखर्जी व चालक श्याम रायची रवानगी अखेर न्यायालयीन कोठडीत झाली आहे. वांद्रे न्यायालयाने या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व चालक श्याम राय या तिघांची पोलिस कोठडी आज (सोमवारी) संपणारी होती. ३ वर्षांपूर्वी शीनाची हत्या झाली असून या प्रकरणातील भक्कम पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे इंद्राणी व अन्य दोघांना पुन्हा पोलिस कोठडी मिळावी यासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. या पार्श्वभूमीवर इंद्राणी व तिचा चालक श्याम रायला आज वांद्रेतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना पोलिस कोठडी न देता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. तर संजीव खन्नाला पुढील चौकशीसाठी कोलकात्याला नेण्यात आले आहे. संजीवला कोलकात्यातील न्यायालयासमोर हजर केले जाईल असे समजते.
मृतदेह शीनाचाच
रायगडमध्ये आढळलेले मृतदेहाची अवशेष शीना बोराचेच असल्याचे फॉरेन्सिक चाचणीतून स्पष्ट झाले आहे. शीनाचा मृतदेहाचे डीएनए इंद्राणींच्या डीएनएशी जुळल्याची माहिती सूत्रांनी दिली.