मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा ड्रायव्हर श्याम रायची वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तसेच इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाने दिलेल्या माहितीची शाहनिशा करण्यासाठी त्याला कोलकाता येथे नेण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले़या तिन्ही आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी वांद्रे महानगर दंडाधिकारी जी़ आऱ तौर यांच्यासमोर हजर करण्यात आले़ इंद्राणी व रायच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे विशेष सरकारी वकील वैभव बगाडे यांनी न्यायालयासमोर सांगितले. तर, खन्नाने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला सकाळी विमानाने कोलकाता येथे नेण्यात आले.मंगळवारी त्याला परत मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले जाईल़ अथवा तेथेच कोलकाता येथील न्यायालयात हजर केले जाईल़ यासाठी त्याच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करावी, अशी मागण अॅड़ बगाडे यांनी केली़याला खन्नाच्या वकिलाने विरोध केला़ तर न्यायालयाने खन्नाच्या अनुपस्थितीत कोणतेही आदेश जारी करण्यास नकार दिला आणि इंद्राणी व रायची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ इंद्राणीच्या वकील गुंजन मंगला यांनी तिला कारागृहात घरचे जेवण देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली़ त्यावर येत्या गुरूवारी सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले़इंद्राणी मुखर्जी, श्याम राय यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी संध्याकाळी ७च्या सुमारास खार पोलीस ठाणे गाठले. मारियांसोबत सहआयुक्त (का व सु) देवेन भारतीही होते. मात्र या दोघांआधीच इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी खार पोलीस ठाण्यात उपस्थित होते. दुपारपासून खार पोलीस पीटर यांची चौकशी करीत होते. मरिया आणि भारती यांनी पीटर यांच्याकडे मालमत्तेबाबत चौकशी केल्याचे समजते. इंद्राणी भायखळा कारागृहात : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या इंद्राणी मुखर्जीला संध्याकाळी भायखळा येथील महिला कारागृहात बंद करण्यात आले. आता जामीन मिळेपर्यंत इंद्राणीला याच कारागृहात दिवस काढावे लागतील. विशेष म्हणजे घरचे जेवण मिळावे या अर्जावर न्यायालय १० सप्टेंबरला निकाल देण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत तिला कारागृहातील अन्य महिला कैदी जे जेवतात त्याच जेवणावर समाधान मानावे लागणार आहे.
इंद्राणी व राय न्यायालयीन कोठडीत
By admin | Updated: September 8, 2015 02:13 IST