कर्जत : प्रत्येक रेल्वे स्थानकातील इंडिकेटर्स व घड्याळ प्रवाशांसाठी महत्त्वाचे असते. प्रत्येक प्रवासी रेल्वे स्थानकात आल्यावर प्रथम त्याची नजर रेल्वे स्थानकावरील इंडिकेटर व घड्याळावर जाते. मात्र कर्जत रेल्वे स्थानकावरील घड्याळ व इंडिकेटर्सचे तीनतेरा वाजले असून, कोणतीही वेळ व गाडी यावर कोणत्याही वेळेला दाखविण्याची किमया या स्थानकावर नेहमीच होत असते. त्यामुळे प्रवासीवर्गात संभ्रम निर्माण होत असतो.इंडिकेटर्स व घड्याळावरील माहितीच्या आधारे प्रत्येक प्रवासी कुठली गाडी पकडण्याची किंवा गाडीला अजून किती वेळ आहे, याचा निर्णय घेत असतात. रेल्वे स्थानकातील इंडिकेटर्स व घड्याळे किती महत्त्वाची आहेत व त्यावरची माहिती चुकीची किंवा अर्धवट असली तर प्रवाशांना याचा फार त्रास सहन करावा लागतो. किंबहुना चुकीच्या किंवा अर्धवट माहितीमुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो. कर्जत रेल्वे स्थानकातील बऱ्याच दिवसांपासून सर्वच इंडिकेटर्स व घड्याळांची अवस्था खराब आहे. प्रत्येक फलाटावर असलेल्या घड्याळावर वेगवेगळी वेळ दर्शविण्यात येत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. शुक्रवारी प्लॅटफार्म क्रमांक दोनवर सकाळी आठच्या सुमारास सिंहगड एक्स्प्रेसच्या वेळेवर चक्क ११.५६ ची खोपोली लोकल लावण्यात होती व घड्याळावर ००.००.०० अशी वेळ दर्शविण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचीही तारांबळ उडाली. कर्जत रेल्वे स्थानकात कित्येक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे व याबाबत नेहमीच संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असल्याचे कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी सांगितले. तक्रार के ल्यावर काही दिवसांपुरते व्यवस्थित होऊन पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. ही समस्या कायमची सुटावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. (वार्ताहर) >तक्रार के ल्यावर काही दिवसांपुरते व्यवस्थित होऊन पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते.>कर्जत रेल्वे स्थानकातील सर्व इंडिकेटर्स व घड्याळे कायमच सुरळीत व अचूक असावित, जेणेकरून कर्जतकरांना व इतर प्रवाशांना याचा कधीच त्रास होणार नाही यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. - पंकज ओसवाल,कर्जत रेल्वे प्रवासी संघटना
कर्जतमधील इंडिकेटर्समध्ये बिघाड
By admin | Updated: July 31, 2016 02:26 IST