मुंबई : जगभरात भारताबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय साहित्याबद्दल व संस्कृतबद्दल लोकांमध्ये जिज्ञासा आहे. भारतीय वास्तुशास्त्र, योग, खगोलशास्त्र व आयुर्वेद याबद्दल देखील लोकांमध्ये कुतूहल आहे. या संधीचा उपयोग करून भारताने संस्कृत भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना खुला करावा, असे उद्गार सी. विद्यासागर राव यांनी काढले.संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार, संशोधन व अध्यापनासाठी १६ मान्यवरांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते.विद्यासागर राव म्हणाले, मुंबईसह अनेक ठिकाणी जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच या भाषा शिकविणाऱ्या संस्था आहेत. संस्कृत भाषा अल्पावधीत शिकविण्यासाठी देखील ‘मॅक्स मूलर भवन’ सारख्या संस्था निर्माण करण्याबद्दल शासनाने विचार करावा.उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, संस्कृत ही राजमाता आहे. ही भाषा सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचविता येईल याचा विचार व्हावा. प्राचीन संस्कृत पंडित हा पुररस्कार सूर्यकांत देवीदास जोशी (परळी, वैजनाथ) व डॉ देवदत्त पाटील, पुणे यांना देण्यात आला, तर दिनकर माधव फडके, पुणे व कृष्ण गोविंद आर्वीकर, नागपूर यांना वेदमूर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ मुरलीधर अनंत नाईक, सोलापूर, डॉ लक्ष्मण मोहरीर, औरंगाबाद, डॉ पंकज चांदे, नागपूर, डॉ गौरी माहुलीकर, डॉ संध्या पुरेचा, प्रो. शशीप्रभा कुमार, नोएडा , डॉ अरुंधती सुधाकर जोशी, अहमदनगर, हरि कृष्ण घळसासी, डॉ नंदा जयंत पुरी, नागपूर, डॉ रूपाली रवींद्र कापरे, संगमनेर, डॉ प्रसाद शरद कुलकर्णी, येवला, नाशिक व डॉ गौतम पटेल, अहमदाबाद यांना यावेळी गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
‘भारताने संस्कृतद्वारे ज्ञानखजिना खुला करावा!’
By admin | Updated: March 30, 2015 02:41 IST