भोसरी : गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा चढला असल्याने वाढलेल्या तापमानात शरीराला गारवा व ऊर्जा मिळण्यासाठी नागरिकांची पावले आपोआपच शीतपेयांच्या दुकानापुढे थबकतात. ही दुकाने काही क्षण का होईना, नागरिकांना थंडावा देत आहेत. उसाचा रस, फळांचा रस, लिंबू-सरबत, ताक, गोळा या शीतपेयांच्या दुकानावर गर्दी वाढलेली आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी भोसरीत मुख्य रस्ते, बाजार, तसेच चौकांमध्ये आता सरबत, उसाचा रस, आईस्क्रीम, कुल्फी, लिंबू-सरबत यांसारख्या थंड पदार्थांची दुकाने थाटलेली दिसत आहेत.सध्या थंडपेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक पेयांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दुकानदार कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)>आईस्क्रीमचे विविध प्रकारउन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक आईस्क्रीम खाणे जास्त पसंत करतात. बाजारात विविध प्रकारचे म्हणजेच काजू, पिस्ता, केशर, व्हॅनिला, हिरामोती, गुलकंद, पानमसाला, अमेरिकन ड्रायफ्रूट यासारखे आईस्क्रीम उपलब्ध आहे. लहान मुलांना फळांचे व चॉकलेटचे आईस्क्रीम पसंत असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास नागरिक परिवारासोबत जाऊन आईस्क्रीमचा आनंद घेताना दिसून येत आहेत. हे आईस्क्रीम १० ते ५० रुपयांना मिळते.>थंडगार लिंबूसरबतनुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या असून, लग्नसराई सुरू झाल्यामुळे लग्नात मठ्ठा, ताक, तसेच लिंबूसरबत मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. पाणी पिण्यापेक्षा लोक जास्तीत जास्त लिंबूसरबत पितात. अनेक ठिकाणी मठ्ठा व जलजिराच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. साधारणपणे १० रुपये ग्लास मिळणारा हा जलजिरा सर्वांनाच आवडतो. महाविद्यालय, शाळा, मंगल कार्यालय या भागांमध्ये या गाड्या दिसतात.>बर्फगोळा लोकप्रियउन्हाळ्यात बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलते आकर्षण असते. विविध रंग, चवींत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे. साधा गोळा, मावा गोळा, आईस प्लेट यांसारखे प्रकार यात उपलब्ध आहेत. शहरामध्ये आयटी पार्कमुळे आईस्क्रीम पार्लरची संख्या वाढली आहे. तरीही बर्फगोळ्याचे महत्त्व अद्याप टिकून आहे. बर्फाचा गोळा घेण्यासाठी लहान मुले गाड्यांभोवती गर्दी करीत असल्याचे दिसून येते. गोळ्यांच्या दरात वाढ झाली आहे.>ज्यूसला मागणीभोसरीत विविध ठिकाणी ज्यूसची दुकाने लावण्यात आली आहे. विविध प्रकारचे सरबत याठिकाणी उपलब्ध आहे. चॉकलेट शेक, कोल्ड कॉफी, लिंबू सरबत, रोझ मिल्कशेक, तसेच अननस, स्ट्रॉबेरी, चिकू, सफरचंद, संत्री या फळांच्या ज्यूसची मागणी वाढली आहे. हे सर्व प्रकारचे ज्यूस साधारणपणे १० ते ४० रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. अन्य शीतपेयांच्या तुलनेत उसाचा रस स्वस्त व मस्त असल्याने त्याला या दिवसांत अधिक मागणी दिसून येते.>सकाळी ११पासूनच उन्हाच्या झळा लागू लागतात. दुपारनंतर तर उष्णता असह्य होते. शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी थंडपेयांचा आधार घ्यावा लागतो. काही क्षणांसाठी का होईना शीतपेये आराम देतात. - सपना माळी, भोसरी>विशेषत: संध्याकाळी चाकरमान्यांची रस पिण्यासाठी अधिक गर्दी असते. दुपारी अधिक ऊन असल्याने बहुतेक लोक घराबाहेर, कार्यालयाबाहेर पडायचे टाळतात. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले असतात. तसेच बसथांब्यावरही गर्दी कमी असते.- फय्याज शेख, ज्यूस विक्रेता, भोसरी
शीतपेयाच्या दुकानांवर वाढली गर्दी
By admin | Updated: March 2, 2017 01:51 IST