तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूचना : महाविद्यालयांमधील गुणात्मक सुधारणांसाठी पुढाकार योगेश पांडे - नागपूर‘राज्यातील अनेक विद्यापीठांतील शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याची सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिवाय, अनेक महाविद्यालयांत नियमित शिक्षक, सोयीसुविधा इत्यादींची वानवा आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांत गुणात्मक वाढ होणे अपेक्षित आहे. हीच बाब लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व महाविद्यालयांमधील गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. संस्थांनी कार्यालयीन कामकाजासाठी पारंपरिक पद्धत सोडून ‘ई-गव्हर्नन्स’चा प्रभावी वापर करावा तसेच संस्थेची इत्थंभूत माहिती संकेतस्थळावर सादर करावी, असे निर्देश संचालनालयातर्फे देण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ शिक्षणात सुधारणा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव, उपसचिव, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव उपस्थित होते. बैठकीत उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव इत्यादी मुद्यांवर सखोल विचार झाला.बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व संलग्नित पदवी व पदव्युत्तर संस्थांना तातडीचे पत्र लिहिले आहे. संस्थांच्या नियंत्रणासाठी तसेच अन्य कार्यालयीन कामकाजासाठी ‘ई-गव्हर्नन्स’चा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांनी शिक्षकांची माहिती सादर करण्याचे म्हटले आहे़ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजुरी, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या, महाविद्यालयात उपलब्ध सोयीसुविधा, तक्रार निवारणासाठीची उपाययोजना यासंदर्भातील विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय, महाविद्यालय ज्या विद्यापीठाशी संलग्नित असेल, त्याच्या संकेतस्थळावरदेखील उपरोक्त माहिती अपलोड करण्यात यावी, असे पत्रात नमूद केले आहे.
‘ई-गव्हर्नन्स’चा वापर वाढवा!
By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST