पुणे : सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नेहरू रस्त्यावर गिरीधर भवन चौक ते मार्केट यार्ड पोस्ट आॅफिस चौक रस्त्यावर रिलायन्स जिओ कंपनीने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता खोदाई केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, असे पत्र महानगरपालिकेकडून स्वारगेट पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.मोबाइल कंपन्यांकडून परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात खोदाई केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत. रस्ते खोदाईसाठी ४ हजार रुपये मीटर दराने शुल्क महापालिकेकडे भरावे लागते. त्यामुळे मोबाइल कंपन्यांकडून कमी अंतराच्या खोदाईसाठी परवानगी घेऊन प्रत्यक्षात मोठ्या अंतराची खोदाई केली जात आहे. रिलायन्स कंपनीला हाजी रसूल भाई पानसरे बाल उद्यान ते मार्केट यार्ड बाफना एक्सपोर्ट अशी खोदाईसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कंपनीने सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील गिरीधरभवन चौक ते मार्केट यार्ड चौकापर्यंत ३०० मीटरची अधिक खोदाई केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ऋषी बालगुडे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार बकोरिया यांनी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पथ विभागाने केलेल्या चौकशीमध्ये रिलायन्स कंपनीने परवानगी घेतल्यापेक्षा जादा खोदाई केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रिलायन्स जिओ कंपनीला याबाबत २४ तासांच्या आत खुलासा करण्याची नोटीस १४ जानेवारी रोजी बजावण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून समाधानकारक खुलासा झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी कंपनीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे पत्र कनिष्ठ अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता राजेंद्र अर्धापुरे व कार्यकारी अभियंता रामचंद्र शेळकंदे यांनी दिले आहे.
मोबाइल कंपनीकडून बेकायदेशीर खोदाई
By admin | Updated: January 21, 2016 01:27 IST