विजय सरवदे - औरंगाबाद
पातळीवरील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादेतच सुरू होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील एक स्वतंत्र इमारत देण्याची तयारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दर्शवली आहे.
केंद्र शासनाने अर्थसंकल्पामध्येच महाराष्ट्रासह देशात पाच ठिकाणी ‘आयआयएम’च्या उभारणीची घोषणा केली होती. त्यानंतर मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये ही संस्था सुरू व्हावी, यासाठी राजेंद्र दर्डा, अशोक चव्हाण, राजीव सातव, चंद्रकांत खैरे, उद्योजक मुनीष शर्मा, राम भोगले, विवेक देशपांडे याशिवाय अन्य राजकीय नेत्यांनी मागणी लावून धरली होती. संस्थेला सुमारे दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने औरंगाबादसह नागपूर, पुणो विभागांकडूनही प्रस्ताव मागविले आहेत. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी अब्दीमंडी, करोडी तसेच ‘डीएमआयसी’साठी संपादित केलेल्या जागेचा प्रस्तावही उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठविलेला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण सचिव संजय चहांदे तसेच जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी शनिवारी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याकडे ‘आयआयएम’साठी पायाभूत सुविधा देण्याबाबत विचारणा केली. तेव्हा कुलगुरूंनी यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय कळवितो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर तात्काळ डॉ. शिवाजी मदन, डॉ. अशोक मोहेकर, डॉ.वसंत सानप, डॉ. दत्तात्रय आघाव, डॉ. प्रमिला जाधव या ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्यांना कुलगुरूंनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विद्यापीठात ‘आयआयएम’सारखी राष्ट्रीय संस्था सुरू होत असेल, तर ते मराठवाडय़ाचे भाग्य आहे, या शब्दात या सदस्यांनी आपली भावना कळवली.