कोल्हापूर : आमच्या जिवावरच राज्य व केंद्रातील भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सत्तेत सहभागी झालो तरी आंदोलनं करणारच. आंदोलन करतो म्हणून भाजपने खुशाल मंत्रिपद नाकारावे, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिले. भाजपला अडचण वाटत असेल, तर त्यांनी आम्हाला बाजूला करावे, असा इशाराही त्यांनी पत्रपरिषदेत दिला. ‘रासप’चे नेते महादेव जानकर यांनी मंत्रिपद न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तुम्ही काय भूमिका घेणार आहात? अशी विचारणा केली असता, आम्ही सरकारमधून का बाहेर पडावे? त्यांना अडचण वाटत असेल तर आम्हाला काढून टाकावे. मुळात आम्ही सत्तेसाठी सरकारमध्ये सहभागी झालेलो नाही. आमच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल विचारले असता शेट्टी म्हणाले, पवारसाहेब जे बोलतात, त्याच्या उलटे करतात. सत्तेत असताना शेतकऱ्यांना कितीवेळा कर्जमाफी द्यायची, असा सवाल आम्हाला तेच करत होते. (प्रतिनिधी)
अडचण वाटत असेल तर आम्हाला बाजूला करा
By admin | Updated: June 3, 2015 03:14 IST