ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - राज्याच्या सत्तेत १० टक्केवाटा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू असा इशारा घटकपक्षांनी भाजपाला दिला आहे. राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्ता येऊन सहा महिने उलटल्यावरही सत्तेत वाटा न मिळाल्याने तसेच दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज झालेल्या ( रिपाईं, स्वाभिमानी संघटना, शिवसंग्राम आणि रासप) घटकपक्षांची आज मुंबईत बैठक पार पडली. रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली असून मित्रपक्षांच्या मागण्यांबबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी घटकपक्षांच्या सर्व नेत्यांनी भाजपकडून आपल्याला अन्यायाची वागणूक मिळाल्याचे सांगितले. आम्हाला मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे सत्तेत दहा टक्के वाटा, चारही घटकपक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदे आणि राज्यातील महामंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.