ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - ज्या डॉक्टरांना मारहाणीची भीती वाटत आहे, त्यांनी नोकरी सोडावी, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने निवासी डॉक्टरांना मंगळवारी फटकारले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले सुरूच असून, गेल्या आठ दिवसांत चार ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. यावर संपकरी निवासी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.
जर डॉक्टरांना मारहाणीची भीती वाटत असेल तर त्यांनी नोकरी सोडावी. अशा प्रकारे आंदोलन करण्याचे डॉक्टरांचे वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे. तुम्ही कर्तव्य योग्यतेने पार पाडत नसाल तर काम करायलासुद्धा अपात्र आहात. एखाद्या कारखान्यातील कामगाराप्रमाणे तुम्ही वागू नका, असे म्हणत निवासी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने फटकारले. तसेच निवासी डॉक्टर ऐकत नाहीत तर त्यांना संघटना काढून का टाकत नाही? असा सवाल करत जे डॉक्टर ऐकत नाहीत त्यांची नावे आम्हाला सांगा, असेही यावेळी उच्च न्यायालयाने म्हटले.
राज्यात रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांवर हल्ले सुरू आहेत. त्यामुळे राज्यभरातील निवासी डॉक्टर्स सोमवारीपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये 1100 सुरक्षारक्षक नेमण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दिली. तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे.