मुंबई : मातृभाषा ही आपल्या ओळखीपुरती असते आणि मातृभाषा हरवली की तुमचे भविष्य हरवते. तेव्हा आपली मातृभाषा जपणे गरजेचे आहे, असे उद्गार ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी काढले.मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्रातर्फे आयोजित राजीव गांधी व्याख्यानांतर्गत 'साहित्य आणि समाज' या विषयावर भालचंद्र नेमाडे बोलत होते. ते म्हणाले, आपण साहित्याकडे वेळ घालविण्याचे साधन म्हणून पाहतो. आपल्याकडची पद्धत एककेंद्री असल्याने वतरुळाच्या परिघावरील लोकांचा समाज विचारच करत नाही. आपण जुन्या गोष्टी, रुढी-परंपरा, पद्धती कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्या बदलत नाहीत. तेव्हा लेखकांनी त्यात पडूच नये, असा सल्लाही त्यांनी लेखकांना दिला.आपले लिखित साहित्य शुद्र ठरेल इतके आपले मौखिक साहित्य समृद्ध आहे. आपल्याकडे लोकगीते, तमाशे, वग असे मौखिक साहित्य लिखित साहित्याला मागे टाकेल, असेही नेमाडे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. दरम्यान, 'हिंदू' कादंबरीचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती व्याख्यानादरम्यान देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, संस्कृत विभागप्रमुख डॉ. गौरी माहुलीकर, मराठी विभागप्रमुख डॉ. भारती निरगुडकर आणि केंद्राचे डॉ. चंद्रकात पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मातृभाषा हरवली तर भविष्य हरवेल - नेमाडे
By admin | Updated: August 14, 2015 11:43 IST