Bharat Gogawale on Election: महापालिका निवडणुकीत भाजपसोबत महायुती करण्याचा आमचाही प्रयत्न आहे. पण या गोष्टी सन्मानाने झाल्या तरच महायुतीचा निर्णय होईल. अन्यथा वेगळा निर्णय होईल, असे शिंदेसेनेचे नेते, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रविवारी स्पष्ट केले.
युवासेनेकडून आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले रविवारी शहरात होते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना गोगावले म्हणाले, लोकांना वेगवेगळ्या उपमा दिल्याशिवाय संजय राऊत यांचा दिवस जात नाही. खासदार संजय राऊत यांना पक्ष वाढविण्यासाठी नव्हे तर बोलण्यासाठी ठेवले आहे. संजय राऊत हे बोलले नाहीत, तर त्यांना उद्धव ठाकरे पक्षात ठेवणार नाहीत. त्यामुळे ते बडबड करत असतात. त्यांच्या या बडबडीमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाताहत होत आहे. आपल्या बोलण्यातून व वागण्यातून संजय राऊत त्यांचा पक्ष बुडवण्याचे काम चोख करत आहेत,ते पक्ष बुडविण्याचे काम करीत आहेत.
महापालिका निवडणूक महायुती व्हावी यासाठी योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. कुणी कुणाला डावलण्याचा प्रयत्न करू नये एवढीच आमची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.