सोलापूर : सनदशीर मार्गाने चाललेली आंदोलने आणि निवेदने व मागण्यांची भाषा त्यांना समजत नसेल तर आता मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी येथे बोलताना केले. महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्णिकनगर येथील चिल्ड्रन पार्क येथे राणे यांची जाहीर सभा झाली. या वेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार आदी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत सकल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षण व इतर मागण्यांसाठी घोषणाबाजी करत पत्रके वाटली होती. त्यावर ‘त्यांना फोटो काढू द्या आणि जाऊ द्या,’ असे फडणवीस म्हणाले होते. या विधानाचा राणे यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यात ३४ टक्के मराठा समाज असताना फडणवीस समाजाची अवहेलना करीत असतील तर तुम्ही सहन करणार का, असा सवाल त्यांनी केला. बस्स झाले निवेदने, मोर्चे आणि मागण्यांची भाषा, आता फडणवीस यांना धडा शिकविला पाहिजे, असे थेट आवाहन राणे यांनी केले. आमचे सरकार असताना मराठा व मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी आपण केवळ बोलघेवड्याची भूमिका न बजावता या दोन्ही समाजांना प्रत्यक्ष आरक्षण दिले होते. भारतीय जनता पार्टी काय किंवा शिवसेना काय या दोन्ही पक्षांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे ते फक्त खेळवत आहेत. आता तर समाजाची खिल्ली उडविण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस करू लागले आहेत. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)फडणवीसांनी दिली उद्योगपतींना सवलतआमचे सरकार असताना याच फडणवीस यांनी आम्हाला कापसाच्या भावाबाबत विचारणा केली होती, पण आज कापूस व उसाला काय भाव दिला जात आहे? पडलेल्या शेतीमालाच्या भावाने शेतकरी हवालदिल झालेला असतानाही सरकारला दिसत नाही. स्टील उद्योगपतींना विजेत सवलत दिली जाते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप राणेंनी केला.
आंदोलने बस्स झाली, आता धडा शिकवा
By admin | Updated: February 14, 2017 04:17 IST