ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - सिंचन घोटाळ्यापाठोपाठ भाजपाने अर्थ खात्यावरुनही राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 'राज्यातील अर्थ खात्यामध्ये काही गोंधळ झालाय का, विनाकारण खर्च झालाय का, आवश्यक नसताना कर्ज घेतलंय का, तसेच जास्त व्याजदराने आपण कर्ज घेतलाय का या सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्यासाठी अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा आमचा विचार आहे असे विधान राज्याचे नवनियुक्त अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
सोमवारी नागपूरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विनाकारण कर्ज काढलंय का, अर्थ खात्यासमोर आव्हाने व उपाय, विविध विभागांना दिलेला निधी कुठे वापरला यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आम्ही श्वेतपत्रिका काढण्याच्या विचारात आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणा-यांवर कायदाच कठोर कारवाई करेल मग डल्ला मारणारा व्यक्ती छोटा असो किंवा मोठा असा इशाराच त्यांनी दिला.
अर्थ खात्याची श्वेतपत्रिका समोर आल्यास या विभागातील महत्त्वपूर्ण माहिती उघड होईल. आघाडी सरकारमध्ये हे खाते अजित पवारांकडे होते. त्यामुळे अजित पवारांची कोंडी करण्यासाठी भाजपाने हे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपा सरकारने श्वेतपत्रिका काढावीच, त्यामुळे जनतेसमोर सत्य येईल असे म्हटले आहे. राज्याच्या तिजोरीतील पैसे खर्च करताना विधीमंडळाची परवानगी लागते, मुनगंटीवार राजकीय फायद्यासाठी असे विधान करत असल्याची टीकाही त्यांनी केली.