मुंबई : सीबीएसई, आयसीएसई, आयबी आदी मंडळांच्या शाळांचे पेव मुंबईसह राज्यात फुटू लागले आहे. या मंडळाची शाळा सुरू करण्यास राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे असताना कांदिवली व बोरीवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने शासनाच्या मान्यतेशिवाय आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे.स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, शिक्षण विकास मंडळ ट्रस्टमार्फत १९९४मध्ये बोरीवलीत व अमेरिकन एज्युकेशन ट्रस्टने १९९८ला कांदिवलीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळा सुरू केली. पण २०१३मध्ये संस्थाचालकांनी राज्य शासनाच्या परवानगीशिवाय राज्य मंडळाशी संलग्न शाळा बंद करून थेट आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू केली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीकांत बेलवलकर यांनी मुंबई पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली होती. शिक्षण विभागाने दिलेल्या उत्तरात संस्थेने कांदिवली, बोरीवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने अभ्यासक्रम बदलाबाबत कोणताही प्रस्ताव विभाग निरीक्षक इंग्रजी माध्यम यांच्याकडे सादर केला नसल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
आयसीएसई बोर्डाची शाळा मान्यतेविना
By admin | Updated: December 29, 2014 05:51 IST