वेदप्रताप वैदिक : आतंकवाद्यांशी वारंवार भेटीलनागपूूर : आतंकवादी हाफिज सईदला भेटलो म्हणून काँग्रेसच्या दोन खासदारांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मी जे कार्य करतो आहे ते राष्ट्रासाठी करतो आहे. हाफिज सईदला भेटण्यामागेही माझा उद्देश राष्ट्रहिताचा होता. असे असतानाही माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदारांनी केली होती. दोनच काय, तर अख्ख्या संसदेने एकमताने हा प्रस्ताव संमत केला तरीही मी मागे हटणार नाही. दोघांच्या मागणीवर जर अख्खी संसद भरकटणार असेल व माझ्यावर कारवाई करणार असेल, तर दुर्दैव आहे. मी संसदेचा सन्मान करतो. मला गर्व आहे. त्यामुळे मी संसदेची कुठलीही कुचेष्टा केली नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार व कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे चेअरमन डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी दिली.श्रमिक पत्रकार संघाच्या मीट द प्रेस कार्यक्रमात डॉ. वैदिक बोलत होते. वैदिक यांनी काश्मीरवर केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला होता. काश्मीरसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, भारतव्याप्त व पाकव्याप्त असे काश्मीरचे दोन भाग झाले आहे. भारताने जी स्वायत्तता काश्मीरला दिली आहे. तशीच पाकिस्तानव्याप्त असलेल्या काश्मीरला द्यावी. दोन्ही भागातील नागरिकांना स्वतंत्र वावरता आले पाहिजे. आपण देशाचे नागरिक आहोत, ही भावना येथील लोकांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे वैदिक म्हणाले. जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्याशी झालेल्या भेटीमुळे माझ्यावर आरोप झालेत. या भेटीमागे माझी भूमिका राष्ट्रहिताची होती. मी हाफिज सईदला चांगल्या उद्देशाने भेटलो. त्याचे मनपरिवर्तन करण्याचा माझा प्रयत्न होता. यापूर्वीही अनेक दशहतवाद्यांना मी भेटलो आहे. त्यामागची माझी भावना राष्ट्रहिताचीच होती. त्यांना सरकारच्या प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न होता. मात्र माझ्यावर जे आरोप झालेत, त्यामुळे माझ्या प्रमाणिकपणावर आघात झाला आहे. असे आरोप होतच राहतील, मात्र माझ्या भेटीतून राष्ट्रहित साधत असेल, तर यापुढेही अशा लोकांशी भेटण्याला मला काहीच हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भासाठी एकत्रित लढ्याची गरजलहान राज्यामुळेच त्या-त्या भागाचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास होत असतो. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन योग्यच आहे. मात्र ही आंदोलने विखुरलेल्या अवस्थेत आहेत. विदर्भाची मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर त्यासाठी एकत्रित लढाच गरजेचा आहे. विदर्भाच्या समर्थनासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांचे प्रतिनिधी मंडळ तयार करा, अन्य क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना एकत्र आणा व या सर्वांची महासमिती तयार करा. पंतप्रधानांना ही महासमिती भेटत असेल, तर मी त्यात राहील. देशाचे पंतप्रधान आत्मविश्वासाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते नक्कीच विदर्भ देतील. त्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. २०१९ पर्यंत हा दबाव कायम ठेवल्यास, नक्कीच विदर्भ वेगळा होईल, अशी अपेक्षा वैदिक यांनी व्यक्त केली.
मी संसदेची चेष्टा केली नाही
By admin | Updated: September 9, 2014 01:14 IST