नागपूर : मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचा आहे. १२ खात्यांचा मंत्री आहे. मला राज्यपाल करून राज्याच्या राजकारणाबाहेर पाठवणार अशा बातम्या देण्यात आल्या पण पक्षाने मला विधान परिषदेत नेता करून मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीला आणून बसवले, अशी वल्गना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.गारपीटग्रस्तांच्या समस्यांवरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी विरोधकांबरोबर स्वपक्षातील विरोधकांवरही चौफेर हल्ला चढवला. गारपीट झाली तेव्हा खडसे अहिराणी चित्रपट पाहण्यात दंग असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचा उल्लेख माणिकराव ठाकरे यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, मीडियाचे याकरिता कौतुक करायला हवे. मागचे व पुढचे काही न दाखवता त्यांनी मी चित्रपट पाहत असल्याची बातमी दिली. गारपीट झाल्याने मी त्या दिवशीचा पंढरपूरचा दौरा रद्द केला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली व सूचना दिल्या. अहिराणी चित्रपट पाहण्याचा कार्यक्रम अगोदर ठरला होता. शिवाय हा चित्रपट मुलीच्या हुंड्याकरिता सावकाराचे कर्ज घेणारा शेतकरी, हागणदारीमुक्त गावाची योजना राबवणे या विषयावर होता. कृषीमंत्री या नात्याने बैठक घेतल्यावर महसूलमंत्री या नात्याने या चित्रपटाला करमुक्त करण्याकरिता मी व जिल्हाधिकारी यांनी सोबत हा चित्रपट पाहिला. माझे घर शेतात आहे. लहानपणापासून मी बैलगाडी चालवली आहे. डवरणी केली आहे. माणिकराव तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा काय माहीत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला. खडसेंचे मुख्यमंत्रीपद हुकल्याची शेरेबाजी झाली होती, त्याचा समाचार घेताना ते म्हणाले, मी येथे तरी आलो. माणिकराव तुम्हाला लोकांनी निवडून देखील दिले नाही. गेल्या १५ वर्षांत मी कधीही सिनेमा पाहिला नाही. गेल्या ४० वर्षांच्या तपश्चर्येनंतर सभागृहात नेत्याच्या आसनावर बसण्याची योग्यता मिळवली आहे. मीडियाच्या टीआरपीकरिता मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु या नाथाभाऊने चोऱ्यामाऱ्या केलेल्या नाहीत की दरोडे घातलेले नाहीत. कृषी संजीवनीचा लाभ हवा असेल तर निम्मे पैसे भरले पाहिजेत, हे मी सांगितले. त्यावर लोकांचा पैसे भरायला विरोध असल्याचे आमदारांनी मला सांगितले. त्यावर मुलीशी बोलायला मोबाईलच्या बिलाचे पैसे भरता तर हे पैसे का भरणार नाही हे मी विचारले त्यात गैर ते काय? लागलीच मीडियात बातम्या आल्या नाथाभाऊला राज्यपाल करून राज्याबाहेर पाठवणार. पक्षाला मी विचारले मला कुठे पाठवणार? पक्षाने सांगितले की, नाथाभाऊ तुम्हाला विधान परिषदेत नेतेपदी पाठवणार आहोत. पक्षाने मला वरच्या सभागृहाचा नेता केल्याने मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीला आहे. १२ खात्यांचा मंत्री आहे, असे ते म्हणाले.
मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचा! - खडसे
By admin | Updated: December 17, 2014 02:58 IST