ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळजवळ निश्चित झालेले असतानाच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. विधिमंडळ पक्षनेत्याची निवड अद्याप झालेली नसून आपलेही नाव चर्चेत असल्याचे खडसे यांनी म्हटल्याने त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाची आशा सोडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, आपण नाराज नाही असा खुलासाही त्यांनी केला आहे. खडसे यांच्या या विधानांमुळे चांगलाच पेच निर्माण झाला असून नव्या नेत्याची निवड एकमताने होणार की नवा वाद उभा राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या असून आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. मात्र असे असतानाच खडसे यांनी हे विधान करत आपण अद्यापही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिल्याने आता पुढे नेमके काय घडते याकडेच सर्वांचे लक्ष लागले अाहे.
दरम्यान नेत्याच्या निवडीवरून भाजपात गोंधळ सुरू असल्याची चर्चा असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र हे वृत्त फेटाळत एकमताने नेता निवडू असे स्पष्ट केले आहे.