ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 6 - धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही असं वक्तव्य दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलं आहे. "मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही. धनगर समाजाने मतं दिली असती, तर आज मी केंद्रात मंत्री असतो", असं महादेव जानकर बोलले आहेत.याशिवाय धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी जानकरांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. "धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमचे केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत मी मोदींना धनगर आरक्षणाबाबत विनंती केली", अशी माहिती जानकरांनी दिली.
यावेळी बोलताना मराठा समाजाचं आरक्षण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच रख़डलं असल्याचा आरोप केला. "आरक्षणाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे घिसाडघाई करून काही फायदा नाही", असंही ते बोलले आहेत. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत वादावार भाष्य करताना वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.