हौसे, गवसे, खुशामतखोरांमध्ये स्पर्धा जोरातनागपूर : आपल्या शहरातील माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, याचा प्रचंड आनंद नागपूरकरांना झाला आहे़ नागपूरकरांचे असे आनंदित होणे स्वाभाविक आहे़ त्याला कारणही तसेच आहे़ देवेंद्र फडणवीस नागपूरचे. येथेच ते लहानाचे मोठे झाले. सर्वांमध्ये दिलखुलासपणे वावरले. त्यांना अगदी कुणीही केवळ नावाने हाक मारू शकतो, एवढे त्यांचे अनेकांशी व्यक्तिगत संबंध आहेत. नगरसेवक, महापौर ते आमदार, प्रदेशाध्यक्ष या प्रवासात आजवर त्यांनी अक्षरश: हजारो लोकांसोबत फोटो काढले आहेत. परंतु आता यातील काही स्वार्थी मंडळी याच फोटोंचे भांडवल करून आपला स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ‘मीच’ मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याचे भासविणाऱ्यांची गर्दी वाढत असून फडणवीसांचा बाल व वर्गमित्र असल्याचा दावा करणाऱ्यांची संख्याही अचानक वाढली आहे़काही लोक केवळ प्रौढी मिरविण्यासाठी हे करीत असतील तर हरकत नाही़ मानवी स्वभाव समजून त्याकडे दुर्लक्ष करता येईल़ परंतु ‘मीच खास’च्या आवेशात ‘अब देखोच, तुम्हारे काम कैसे जल्दी होते तो’, ‘चिंता मत करो, मै अभीच देवेंद्रभाऊ से बात करता हूं’, ‘अरे मेरे को बोलो ना, कलही मेरी उनसे फोनपर बात हुई. अगली बारी तुम्हारा काम पक्का’, अशी थाप मारून जर कुणी जाळे टाकत असेल तर ते नक्कीच गंभीर आहे़ विशेष म्हणजे, असे प्रकार नागपुरात सुरू झाले आहेत़ यासाठी हे राजकीय दलाल फडणवीस यांच्यासोबत कधीकाळी काढलेले फोटो आता सोशल मीडियावर शेअर करीत सुटले आहेत. यातून ते अनेक संकेत देऊ पाहत आहेत. लोकमत प्रतिनिधीने अनुभवलेला एक किस्सा तर फारच धक्कादायक आहे़ फडणवीसांच्या अत्यंत जवळ असल्याचा दावा करणारे दोघे एकत्र आले तेव्हा कोण अधिक जवळचा हे पटवून देण्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती़ दोघेही एकमेकांना जुने दाखले देत होते़ यातला एक म्हणाला, मी तर फडणवीसांसोबत एका रुममध्ये राहिलो आहे, तर दुसरा म्हणाला अरे, रुमचे काय सांगतोस मी तर सोबत टिफीन शेअर केला आहे. भररस्त्यावर रंगलेली ही चर्चा ऐकून अवतीभवतीचे लोकही त्यांच्याकडे आशेने पाहू लागले़ भविष्यात यांची गरज पडू शकते हे ताडून काही जण तर त्या दोघांशी ओळखी वाढविण्यासाठीही पुढे आले़ या प्रकारातून आपल्या नागपुरात राजकीय दलाल निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत असून या सर्वांतून स्वच्छ प्रतिमा असणारे मुख्यमंत्री फडणवीस यांची मात्र नाहक बदनामी होण्याची शक्यता वाढली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच एकाएक त्यांच्या बालमित्रांची, वर्गमित्रांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. ही संख्या पाहून फडणवीस सरस्वती विद्यालयाच्या वर्गखोलीत नव्हे तर मैदानावर शिकत होते की काय, अशी शंका वाटायला लागली आहे़ काही स्वयंघोषित मित्र व कार्यकर्त्यांकडून तर अधिकाऱ्यांना धमकाविण्याचेही प्रकार घडल्याची माहिती आहे.या बाबींकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)लोकमतची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे भूषण आहेत. आपल्या गावातील एक तरुण मुलगा प्रचंड परिश्रम घेऊन स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री होतो ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. पण हे कौतुक करीत असताना आपल्या माणसाला जपणे, त्याची बदनामी होणार नाही याची काळजी घेणे हेही आपले कर्तव्य आहे. फडणवीस हे कुणाच्या सांगण्यावरून फसणारे नाहीत. पण राजकीय दलालांमुळे, खुशामतखोरांमुळे विनाकारण संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यांच्याशी जवळीक असल्याचे सांगून, लोकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूकही केली जाऊ शकते. त्यामुळे लोकांना व मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सावध करणे हाच लोकमतचा या बातमीमागचा प्रामाणिक उद्देश आहे.
मुख्यमंत्र्यांचा मीच खास !
By admin | Updated: November 9, 2014 00:52 IST