ठाणे : एरव्ही, पती आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटना नेहमीच घडतात. परंतु, ठाण्यात पत्नी कल्याणीसह सासुरवाडीकडील मंडळींच्या छळाला कंटाळून पती पती रॉकी उर्फ राकेश ठाकूर (२७) याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचा प्रकार कळव्याच्या फुलेनगर भागात घडला. याप्रकरणी पत्नी कल्याणीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.रॉकी आणि कल्याणी यांचे नोव्हेंबर २०१५ मध्ये विवाह झाला होता. त्यांच्यात घरगुती कारणावरुन नेहमीच भांडणे होत होती. ६ मार्च रोजीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. नेहमीच्या भांडणाला कंटाळून त्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यात तो ६० ते ६२ टक्के होरपळला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा ११ मार्च रोजी मृत्यू झाला. त्याला पत्नी कल्याणी, सासरे संतोष ठाकरे, सासू शोभा, मेहुणा प्रथमेश यांनी त्याचा गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार त्याची बहिण रेश्मा ठाकूर यांनी कळवा पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर या चौघांनाही अटक केल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
By admin | Updated: March 14, 2017 07:32 IST