आगर: श्रावण बाळ योजनेच्या येथील लाभार्थींचे अनुदान बंद झाले, असून, पोटच्या गोळय़ांनीही त्यांच्या पोषणाची जबाबदारी झटकल्यामुळे लाभार्थींवर उपासमारीची पाळी आली आहे. अटलबिहारी बाजपेयी सरकारच्या कार्यकाळात निराधार वृद्धांसाठी श्रावण बाळ योजना सुरू करण्यात आली. पोटी, पाठी वारस नसलेल्या, तसेच पोषणाचा आधार नसलेल्या आणि पाल्य किंवा अपत्यांनी पोषणाची जबाबदारी झटकलेल्या वृद्धांचा श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींमध्ये समावेश होतो. या लाभार्थींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा ६00 रुपये आर्थिक मदत दिली जाते. अकोला तालुक्यातील आगरसह परिसरात श्रावण बाळ योजनेचे शेकडो लाभार्थी आहेत. या लाभार्थींना गत चार महिन्यांपासून श्रावण बाळ योजनेचे अनुदान मिळाले नाही. पोटच्या गोळय़ांनी नाकारल्यानंतर शासनानेही झुगारल्यामुळे आम्ही जगावे तरी कसे, असा प्रश्न या लाभार्थींकडून उपस्थित करण्यात येत आहे. काही लाभार्थींच्या पोषणाची जबाबदारी त्यांचे वारस किंवा पाल्य सांभाळत असल्याचे पाहणीत आढळल्यामुळे अशा लाभार्थींचे अनुदान बंद करण्यात आल्याचे श्रावण बाळ योजनेशी संबंधित अधिकार्यांचे म्हणणे आहे, तर आम्ही त्यांच्या पोषणाची जबाबदारी सांभाळण्यास असर्मथ असल्याचे पाल्य आणि वारसांनी लिहून दिल्याचे लाभार्थींकडून सांगण्यात येत आहे. या लाभार्थींंची समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी त्यांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करून द्यावे, अशी अपेक्षा या वृद्ध लाभार्थींकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींवर उपासमारीची पाळी
By admin | Updated: July 15, 2014 00:13 IST