मुंबई : उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिलेले आहेत. असे असतानाच मुंबई विद्यापीठात सुमारे २१४ पदे अद्यापही रिक्त आहेत. तसेच गतवर्षी सुमारे १५० पदे भरण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया रखडल्याने विद्यापीठात प्राध्यापकांची वानवा जाणवू लागली आहे.विद्यापीठाच्या विविध विभागांचे संचालक, अधिकारी आणि प्राध्यापकांची सुमारे ३५५ पदे रिक्त होती. यापैकी २११ पदे भरली आहेत. मात्र डिसेंबर २०१३ मध्ये विविध संवर्गांतील प्राध्यापकांच्या १४७ पदांसाठी अर्ज मागविले होते. या जाहिरातीला एक हजार उमेदवारांनी प्रतिसाद दिला. उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली असली तरी अद्याप विद्यापीठाकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. गेल्या वर्षी जाहिरात दिलेल्या प्राध्यापकांची पदे भरल्यानंतरही सुमारे ६७ पदे रिक्त राहणार आहेत. ही पदे भरण्यासाठी बिंदू नियमावली तयार केली असून, ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. शासनाने प्राध्यापकांची ही ६७ पदे भरण्यास मान्यता दिल्यानंतर या पदासाठी जाहिरात काढण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्राध्यापकांची पदे भरू असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्राध्यापकांची शेकडो पदे विद्यापीठात रिक्त
By admin | Updated: November 24, 2014 03:35 IST