९१.२६ टक्के : मुलींची सरशी कायम, कोकण विभाग अव्वलमुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील बारावीचे सर्व निकाल मोडीत निघाले असून यंदाचा निकाल विक्रमी ठरला आहे. राज्यातील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९१.२६ टक्के इतकी असून निकालात यंदाही मुलीच आघाडीवर आहेत. मागील वर्षी ९०.०३ टक्के इतका निकाल लागला होता. राज्यात कोकण विभाग अव्वल क्रमांकावर असून नाशिक विभाग शेवटच्या स्थानावर आहे.पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.२६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.६८ टक्के लागला असून, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४९ टक्के इतका अधिक आहे. मुलींंचा निकाल ९४.२९ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८८.८० टक्के लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) बदलेला अभ्यासक्रम आणि ८०/२० पॅर्टन यामुळे यंदाही निकालात वाढ झाली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व एचएससी व्होकेशनल या शाखांतील संपूर्ण राज्यातून १२ लाख ३८ हजार ९५४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी १२ लाख ३७ हजार २४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील ११ लाख २९ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के लागला असून रात्र शाळांचा निकाल ६५.०२ टक्के लागला आहे.मुलींचीच बाजीमुंबई मंडळातून १ लाख ३५ हजार मुली आणि १ लाख ५0 हजार ६९३ मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी १ लाख ३१ हजार ३७६ मुले आणि १ लाख २६ हजार ४७0 मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ८७.१८ टक्के मुले तर ९३.३८ टक्के मुली परीक्षेला बसल्या असून या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे.वाणिज्य शाखेतील सर्वाधिक विद्यार्थीदेशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे कल या शाखेतील सुमारे ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातून ५३ हजार ७२३ विद्यार्थी वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसले होते. तर इतर विभागांमधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ ते २३ हजारांच्या दरम्यान आहे. मुंबईतून १ लाख ५९ हजार २३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४३ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९०.३१ टक्के लागला आहे.२३० विद्यार्थ्यांचे निकाल रोखलेमुंबई मंडळात कॉपीची २३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कॉपीचे प्रमाण ०.०१ टक्के असले तरी मंडळाने विभागातील २३० विद्यार्थ्यांचे निकाल रोखले आहेत.
बारावीचा विक्रमी निकाल
By admin | Updated: May 28, 2015 01:49 IST