उर्से : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माशांचा पाऊस, तर कोणी म्हणतेय ओढ्याद्वारे मासे आले. रस्त्यावर मासे याबाबत सध्या सोशल मीडियावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. द्रुतगती महामार्गावर जवळील बऊरवाडी पुलाजवळ ही घटना घडल्याची चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे. परंतु, याबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये गाडी उलटली असल्याची नोंद नाही. परंतु, सोशल मिडियावर याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने मासे रस्त्यावर चालत आले, अशीच चर्चा रंगविण्यात येत आहे. या माध्यमातून काही ग्रुपवर अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अद्यापही उलटसुलट चर्चा सुरू आहे.या घटनेबाबत परिसरातील रहिवासी दत्ता वायभट म्हणाले, ‘‘घडलेली घटना सत्य असून, गाडी उलटली. त्यामुळे गाडीतील मांगुर मासे सर्व रस्त्यावर पसरले. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही वेळेपुरती बंद होती. मात्र अशा प्रकारची घटना तीन वर्षांत तीन वेळा घडली आहे.’’ तसेच उर्से येथील अशोक कारके यांनीही, रस्त्यावर सर्वत्र मांगुर मासे पसरले होते. मुंबईकडून पुण्याकडे जात असताना टायर पंक्चर झाल्याने पिकअप व्हॅन उलटली. त्यामुळे गाडीतील सर्व मांगुर मासे रस्त्यावर पसरले. या वेळी लोकांची मासे घेण्यासाठी धावपळ उडाली. चालकाने मासे नेऊ नका असे सांगितले; परंतु कोणीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. या घटनेबाबत सोशल मीडियावरून मात्र नदीतील मासे रस्त्यावर आले, माशांचा पाऊस पडला, अशा अफवा पसरल्या जात आहेत. तर काही ग्रुपवरून दोन वर्षांपूर्वीचे जुने फोटो टाकण्यात येत आहेत. (वार्ताहर)
द्रुतगतीवर मासे आले कोठून?
By admin | Updated: July 13, 2016 00:32 IST