कल्याण : बनावट कागदपत्रांद्वारे एकाच सदनिकेवर दुसऱ्यांदा कर्ज घेऊन एका हाउसिंग फायनान्स कंपनीला ६० लाखांना गंडा घातल्याप्रकरणी चौकडीविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक पावस्कर, आनंद यादव, निलेश सावंत, राजकुमार नाडर अशी आरोपींची नावे आहेत.टिटवाळा येथील श्री गणेश पार्क गणेश्वर येथे पावस्कर, यादव आणि सावंत यांनी १९ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबरदरम्यान दोन सदनिका घेतल्या. या सदनिकांसाठी त्यांनी कल्याणमधील इंडिया इन्फोलाइन हाउसिंग लिमिटेडमधून गृहकर्ज घेतले होते. मात्र, त्यानंतर या तिघांनी या सदनिकेचे बनावट खरेदीखत तयार करत निधी डेव्हलपर्सच्या नावे बनावट दस्तावेज तयार केले. निधी डेव्हलपर्सच्या राजकुमार यांच्या नावे डोंबिवलीतील एका बँकेत खाते उघडले. त्यानंतर, कल्याण आग्रा रोडवरील वेदमंत्र बिल्डिंगमधील जीआयसी हाउसिंग फायनान्स लि. या कंपनीत हे बनावट दस्तावेज सादर करत पावस्कर यांनी २९ लाख ८० हजार तर आनंद यादव यांनी २९ लाख ३७ हजार रु पये गृहकर्ज मंजूर करून घेतले. ही बाब रोहित मेढेकर यांना समजताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
हाउसिंग कंपनीला लाखोंचा गंडा
By admin | Updated: October 31, 2016 04:00 IST