ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 25 - सध्या बाजारात भाजीपाल्याचे दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यामुळे भाजी बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष करून टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून टोमॅटो सध्या 120 रुपये किलो या दराने विकला जात आहे. यामुळे गृहिणींचं बजेट कोलडमले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाला महागतो. परंतु यंदा भाजीपाल्याच्या दरात अंदाजापेक्षा खूपच अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत सध्या सर्वच भाज्या महागल्या असून इतर जिल्ह्यातून भाजीपाला येत असल्याने वाहतूक खर्च, अडत तसेच घाऊक व्यापा-यांकडून किरकोळ भाजीविक्रेत्यापर्यंत भाजीपाला येईपर्यंत त्यांच्या किमतीत अधिकच वाढ होते.
त्यामुळे किरकोळ विक्रेतेसुद्धा अपेक्षित मजुरी मिळावी, म्हणून ग्राहकांना वाढत्या दरानेच भाजीविक्री करत आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. गेल्या महिन्यात व आता मिळणा-या भाजीच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
फुलकोबी १०० रुपये प्रति किलो, कोबी ४० ते ६० रुपये प्रति किलो, भेंडी १२० रुपये प्रति किलो, चवळीच्या शेंगा शंभर रुपये प्रति किलो, हिरवी मिरची ८० रुपये प्रति किलो, पालक ४० रुपये प्रति किलो, काकडी १०० रुपये प्रति किलो, कारले ६० रुपये प्रति किलो, दुधी भोपळा ४० ते ६० रुपये प्रति किलो असे सध्याचे भाजीपाल्याचे दर आहेत. सर्वाधिक चर्चा सध्या टोमॅटोची आहे. बाजारात सध्या सर्वात प्रति किलो १२० रुपये दराने टोमॅटो विकला जात आहे.
त्यामुळे जेवणात टोमॅटो दिसेनासा झाला आहेच शिवाय भेळ गाडी, खानावळी या ठिकाणाहून टोमॅटो हद्दपार झाल्याच दिसत आहे. विदर्भात सध्या टोमॅटो नसल्याने बाजारात येणारे टोमॅटो हे अहमदनगर येथून येत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.