सचिन भोसले - कोल्हापूर -गेले वर्षभर राज्य शासनातर्फे दिले जाणारे मानधन न मिळाल्याने पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक दिग्गज पैलवानांना अस्मान दाखविणाऱ्या या ज्येष्ठ मल्लाला अखेरच्या दिवसात आपले व आपल्या कुटुंंबाचे जीवन सुरळीत व्हावे, यासाठी शासनाच्या मानधनाचाच आधार आहे. तेच जर मिळाले नाही तर ‘सांगा जगायचं कसं’ असा उद्विग्न सवाल त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कुस्ती वैभव जपणाऱ्या ज्येष्ठ मल्लांपैकी एक असणारे भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना राज्य शासनातर्फे त्यांच्या कामगिरीची दखल म्हणून गेली अनेक वर्षे दरमहा सहा हजार इतके मानधन दिले जाते. मात्र, हे मानधन गेल्या पाच वर्षांत तुटक-तुटक स्वरुपात मिळत आहे. यापूर्वी अडीच वर्षांचे मानधन रखडले होते, ते मिळाले. यंदा पुन्हा शासनाचा कारभार ‘येरे माझ्या मागल्या करीत’ पुन्हा वर्षाचे ७२ हजार इतके मानधन पुन्हा रखडले. मानधन हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने ते यावरच निर्भर आहेत. या मिळणाऱ्या मानधनात आजारपणाचाही खर्च भागत नाही. मात्र, फूल ना फुलाची पाकळी म्हणून हे मानधनच त्यांचा एकमेव आधार आहे. मात्र, गेले वर्षभरात तेही रखडल्याने कोल्हापूरपासून लाहोरपर्यंत व रशियाच्या मल्लांना अस्मान दाखविणाऱ्या या मल्लाची दैनावस्था झाली आहे. स्वाभिमानी मल्लगुणांवर जिंकूनही हिंदकेसरी किताब प्रथम नाकारणाऱ्या स्वाभिमानी श्रीपती खंचनाळे यांनी दुसऱ्यांदा दिल्लीच्या बंतासिंग बलटोया यास अवघ्या सात सेकंदात चितपट करून भारताचा पहिला हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. अनेक दिग्गजांना अस्मान दाखविले. शासनाने १९८०-८१ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. मल्लांचा योग्य सन्मान व्हावा, म्हणून नव्वदीच्या दशकात तत्कालीन राज्य शासनाने सहा हजार इतके दरमहा मानधन दिले. मात्र, गेले वर्षभर ते मानधनच मिळालेले नाही. सध्या ते ८० वर्षांचे आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर स्वरयंत्र बदलणे, मणक्याची पाचवेळा, गुडघ्याची वाटी बदलणे अशा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. यापुढेही आणखी एका गुडघ्याचे आॅपरेशन करणे गरजेचे आहे. त्यामुळे मानधनाबरोबरच अर्थिक मदतीचीही गरज त्यांना आहे. आता शासनाने मानधन वाढवून द्यावेशासनाने आमच्या कामगिरीची दखल घेऊन त्यावेळी सहा हजार इतके मानधन मंजूर केले. मात्र, हे मानधन वेळेवर मिळाले तर ठीक होते. ते कधी वेळेवर मिळालेच नाही. सध्या मिळणारे मानधन माझ्या औषधोपचारावरच खर्च होते. त्यामुळे वर्षभर रखडलेले मानधन तत्काळ देऊन शासनाने किमान पंधरा हजार रु पये इतके मानधन वाढवून द्यावे. - हिंदकेसरी श्रीपती खंचनाळेयांचेही मानधन रखडलेलेचहिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी दीनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचेही मानधन गेले वर्षभर रखडले आहे. हेही ज्येष्ठ कुस्तीगीर मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून गेले वर्षभर मानधन आलेले नाही. हे मानधन लवकरच ज्येष्ठ मल्लांच्या खात्यावर जमा होण्यासाठी तत्काळ पाठपुरावा करून मानधन यापुढे तटणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू. - नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर
हिंदकेसरींचं गेले वर्षभर मान‘धन’ रखडले
By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST