- योगेश पांडे/आनंद डेकाटे, नागपूरवेगळ््या विदर्भासाठीच्या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न असून सकारात्मक भूमिका असणाऱ्या सर्वांकडे पाठिंबा मागण्यात येईल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा मदत घेण्यात येईल, असे मत माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. वेगळ््या विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा देणाऱ्या अणे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी विविध मुद्यांवर परखडपणे मते मांडली.‘आम आदमी पार्टी’, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हे पक्ष वेगळ््या विदर्भाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी भाजपा, काँग्रेस या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही ते म्हणाले.लवकरच मी स्वत: संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांची समस्या सर्वश्रृत आहेच. शेतकरी संघटनांचीदेखील मदत लागणार आहे. चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘आप’प्रमाणेच युवा वर्गाला जोडण्यासाठी नव्या प्रचार-प्रसार तंत्राचा वापर करण्यात येईल. सत्ता आल्यावर भाजपा स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे भाजपाच्या विरोधात मत द्या, असे आवाहन करण्यासाही धजावणार नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा व्यक्तिगत विरोध करणार नाही. विदर्भासाठी राज्यातील सरकार पडणे आवश्यक असेल तर ते पडण्यास हरकत नाही, असेही अणे म्हणाले. ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ व संदेश सिंगलकर हे सुद्धा त्यांच्या सोबत होते.मा.गो. वैद्य यांच्या मागणीचा उल्लेखमी राजीनामा दिला त्याच दिवशी संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी चार राज्ये निर्माण झाली पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती. विकासासाठी लहान राज्यांची भूमिका संघश्रेष्ठींनी कायम मांडली आहे. आंदोलन नव्या स्वरूपात समोर येत असताना संघाकडून याबाबत नक्कीच समर्थन मागू, असेही ते म्हणाले.
विदर्भासाठी संघाची मदत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 01:29 IST